फलटण : फलटण शहर व तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वतीने जाधववाडी येथील कोरोना केअर सेंटरमधील १० बेडच्या ऑक्सिजन पाईपसाठी ८१ हजार रुपयांची मदत करण्यात आली. या मदत निधीचा धनादेश कामाच्या संबंधित ठेकेदारांकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
फलटण तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे - पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जाधववाडी येथील कोरोना केअर सेंटरमध्ये १० बेडच्या ऑक्सिजन पाईपचे काम सुरू आहे. त्यासाठी शिक्षकांनी उभा केलेल्या मदत निधीतून ८१ हजार रुपयांचा धनादेश अजितकुमार चव्हाण यांना संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत देण्यात आला.
ऑक्सिजन पाईपचे काम बुधवारअखेर पूर्ण करण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले आहे. याकामी मदत केलेल्या फलटण तालुक्यातील शिक्षकांचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे - पवार आदींनी काैतुक केले आहे.