कऱ्हाड : नांदगाव ग्रामस्थांना महापुराचा फटका बसला आहे. शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे तर सुमारे तीसहून अधिक घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. याची माहिती मिळताच साताऱ्यातील हेल्पिंग हॅण्ड ग्रुपने नांदगावमध्ये येऊन जीवनावश्यक वस्तूंचे किट प्रत्येक बाधित कुटुंबाला दिले आहे.
दक्षिण मांड नदीकाठावर वसलेल्या नांदगावला पहिल्यांदाच एवढा मोठा पुराचा फटका बसला आहे. बाधित कुटुंबीयांच्या घरातील तेल, मीठ, पीठसुद्धा वाहून गेले आहे. त्यांचे दैनंदिन जीवन पूर्वपदावर यायला निश्चितच वेळ लागणार आहे. पण ते लवकर पूर्वपदावर यावे, या हेतूने सातारकरांनी केलेली मदत महत्त्वाची आहे.
सातारा हेल्पिंग हॅण्ड ग्रुपचे सदस्य सतीश शिवणकर व रावसाहेब संकपाळ यांनी स्वतः नांदगावमध्ये येऊन बाधितांना ही मदत दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे, माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती पाटील, वसंत माटेकर, विजय पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विकास पाटील, विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष जगन्नाथ पाटील, गणपतराव पाटील, माजी सरपंच प्रकाश पाटील, उदय नांगरे, सतीश कडोले, हितेश सुर्वे, जयवंत मोहिते, सागर कुंभार आदी उपस्थित होते.
ग्रामस्थांच्यावतीने वि. तु. सुकरे यांच्या हस्ते सॅनिटायझर व मास्कचे किट देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक बाधिताच्या घरी जाऊन जीवनावश्यक वस्तूचे किट देऊन त्यांना धीर देण्यात आला.
चौकट
पहिली मदत
पुरामुळे नांदगावमधील बाधित हतबल झाले होते. अशावेळी हेल्पिंग हॅण्ड, साताराने पहिली मदत दिली. त्यामुळे नांदगावकर भारावून गेले. ही मदत नेहमीच आमच्या स्मरणात राहील, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
फोटो २८ नांदगाव
नांदगाव येथील पूरग्रस्तांसाठी साताऱ्यातून हेल्पिंग हॅण्डचे सतीश शिवणकर, रावसाहेब संकपाळ यांनी मदत दिली.