सणबूर : काही महिन्यांपूर्वी नाबार्डमधून मंजूर झालेल्या बनपूरी, ता़ पाटण येथील वांग नदीवरील पुलाचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. यापुर्वी निधी मंजुर झाल्यानंतर तालुक्यातील तिनही राजकिय गटांनी आपल्यामुळेच निधी मिळाल्याचे सांगत श्रेयवादाचे राजकारण केले. मात्र, निधी मिळाल्यानंतर काम त्वरीत सुरू होण्यासाठी एकही राजकिय गट पुढाकार घेताना दिसत नाही. बनपुरी येथे असलेला फरशीपूल अतिशय कमी उंचीचा असून पावसाचा जोर वाढला की पूलावर पाणी येऊन वाहतूक ठप्प होते़ दळणवळणाचा प्रश्न निर्माण होतो़ पूला वरून ये- जा करणाऱ्या लोकांना व शालेय विद्यार्थ्यांना जिव मुठीत घेऊनच पुल ओलांडावा लागतो. काही वर्षांपूर्वी या पूलावर पणी असताना पलीकडे जाताना चारजणांना आपला प्राण गमवावा लागला होता. शालेय विद्यार्थ्यांना शाळेत याच पूलावरून जावे लागते़ काहीवेळा पूलावर सतत पाणी असल्याने विद्यार्थ्यांना शाळेतच जाता येत नाही़ शिवाय एखादी व्यक्ती आजारी पडली तर दवाखान्यात नेण्यासाठी पर्यायी रस्ताच नसल्याने मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते़ येथे मोठा पुल व्हावा अशी येथील लोकांची मागणी होती़ त्यानुसार नाबार्डमधून पूलास मंजूरी मिळून सुमारे १ कोटी रूपये मंजूर झाले आहेत़ परंतू गेल्या सहा महिन्या पासून या पूलाच्या कामाचा फक्त श्रेयवाद रंगला असून प्रत्यक्षात पूलाच्या कामास सुरूवात झाली नाही़ राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व देसाई तीनही गटातील कार्यकर्त्यांनी हा पूल आम्हीच मंजूर करून आणला असल्याचा दावा करत आहेत़ या गटातटाच्या श्रेयवादात सर्वसामान्य ग्रामस्थ भरडले जात आहेत. पूलाच्या कामाचा श्रेयवाद थांबवून तात्काळ पूलाचे काम चालू करावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
निधी मिळूनही पुलाच्या कामासाठी चालढकल
By admin | Published: September 03, 2014 8:42 PM