पाटण : ‘ज्या ज्यावेळी महाराष्ट्रातील कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्ती, गाव, शहरावर संकट येते. त्यावेळी अख्खा महाराष्ट्र मदतीसाठी धावून जातो. ही आपली संस्कृती आहे,’ असे मत राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. अतिवृष्टीत नुकसान झालेल्या गावांतील लोकांसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू आहे. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी मदत केली, त्याचे पवार यांनी आभार मानले.
यावेळी पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, सभापती राजाभाऊ शेलार, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, शंकर शेडगे, गुरुदेव शेडगे, सत्यजित शेलार, बाळासाहेब कदम, रामभाऊ मोरे, रामभाऊ मोहिते, मनीष चौधरी, नरेंद्र शेलार उपस्थित होते.
आमदार रोहित पवार कोकणचा पाहणी दौरा करून शुक्रवारी कोयनानगर, पाटण येथील नुकसानीची पाहणी व मदत देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. पवार म्हणाले, ‘गेल्या आठवड्यात कोयना विभागावर नैसर्गिक आपत्तीमुळे ओढवलेले संकट भयावह आहे. या आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी शासन तुमच्यासोबत आहे. सत्तेवर आल्यापासून आपत्तीचा समूळ नायनाट करणारे हे शासन आहे. आपत्ती ही इष्टापत्ती समजून शासन कार्य करत आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत स्थलांतरित तीन गावातील जनतेचे तात्पुरते स्थलांतर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. त्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे. १५ ऑगस्टपर्यंत बाधित पूरग्रस्तांचे स्थलांतर करण्यात येणार आहे.’
रोहित पवार म्हणाले, ‘मी ज्या ठिकाणचा लोकप्रतिनिधी आहे, त्या ठिकाणी ७०० ते ८०० मिमी पाऊस वर्षाला पडतो. पण, कोयना पाणलोट क्षेत्रात हाच पाऊस एका दिवसात पडला आहे. यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. अचानक आलेली ही परिस्थिती आहे. या परिस्थितीला धिराने तोंड दिले पाहिजे. बाधितांना विश्वासात घेऊनच यापुढील वाटचाल होणार आहे. बाधित लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार आहे.’
सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, ‘भूस्खलनाने कोयना विभागातील मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी, बाजे ही गावे पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत. त्या गावांचे तातडीने अन्य ठिकाणी पुनर्वसन होण्यासाठी उपाययोजना होणे ही प्राथमिकता आहे. बाधितांना विश्वासात घेऊन ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी.’
फोटो कॅप्शन
३०पाटण-रोहित पवार
पाटण तालुक्यातील कोयनानगर येतील पूरग्रस्तांशी आमदार रोहित पवार यांनी संवाद साधला. यावेळी सत्यजितसिंह पाटणकर, सभापती राजाभाऊ शेलार उपस्थित होते.