सातारा : जवळवाडी ता. जावली येथे गोपाळ समाजाची अनेक कुटुंबे राहात असून, या कुटुंबांचे गतवर्षी कोरोना काळापासून प्रचंड हाल सुरू आहेत. या कुटुंबांना उद्योजक विजय सावले यांनी जीवनावश्यक वस्तू दिल्या आहेत. त्यांचे हे कार्य अभिमानास्पद असल्याचे गौरवास्पद उद्गार जावलीचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी काढले आहेत.
जवळवाडी ग्रामपंचायत क्षेत्रात गोपाळ समाजाची वसाहत असून गेली अनेक वर्षे काबाडकष्ट, मोलमजुरी व बॅन्ड वादन करून येथील लोकांचा उदरनिर्वाह चालतो. पण गतवर्षापासून त्यांचे हातच थांबले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या लोकांना मदत मिळावी यासाठी जवळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंंच वर्षा जवळ यांनी उद्योजक विजय सावले यांना या समाजाची परस्थिती सांगितल्यावर त्यांनी तत्काळ मदत पोहोच करीत असल्याचे सांगितले.
उद्योजक सावले यांनी गोपाळ समाजाला केलेल्या मदतीबद्दल जावलीचे तहसीलदार राजेंद्र पोळ, गट विकास अधिकारी सतीश बुद्धे, साहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी गौरवोद्गार काढले. या प्रसंगी सरपंच वर्षा जवळ, भामघरचे पोलीस पाटील ज्ञानेश्वर सावंत, ग्रामसेवक वैभव निकम, शंकरराव जवळ, अरुण जवळ आदी उपस्थित होते. या समाजाच्या वतीने श्यामराव चव्हाण व राजेंद्र पवार यांनी आभार मानले आहेत.