मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या मलकापूर कन्या शाळेत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत एकूण ५३० मुली शिक्षण घेतात. कोरोनाकाळात शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करीत कन्याशाळेने मुलींच्या आरोग्याची काळजी घेत ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अध्यापनाचे कार्य संस्थेचे सचिव अशोकराव थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार व पालक वर्गाच्या सहकार्याने सुरूच ठेवले आहे. मुलींच्या तपासणीसाठी अपुरे साहित्य असल्यामुळे अडचणी येत होत्या. ही शाळेची गरज ओळखून रोटरी क्लब ऑफ मलकापूरने ऑक्सिमीटर व थर्मल गन भेट दिली. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधत या साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या मार्गदर्शक संचालिका डॉ. स्वाती थोरात, सदस्य भगवान मुळीक, संजय डोळ, नंदकुमार गायकवाड, विजय चव्हाण, राहुल पाटील, किशोर गवंडी, प्रवीण जाधव, पर्यवेक्षक सुरेश राजे, जयवंत पाटील, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सलिम मुजावर यांनी रोटरी क्लब राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती सांगितली. डॉ. स्वाती थोरात यांनी संस्थेच्या वतीने शाळा स्तरावर मुलींच्या आरोग्याची कशी काळजी घेतली जाते, ते सांगितले. मुख्याध्यापिका सुलोचना भिसे यांनी स्वागत केले. शिल्पा नवाळे यांनी आभार मानले.