सातारा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासन, प्रशासनासह अनेक घटक समाजप्रबोधन करीत आहेत. यामध्ये चिमुकलेही मागे नाहीत. त्यापैकीच सई विनोद बडेकर. पाच वर्षांची ही चिमुरडी पाटण तालुक्यातील गुढे येथील. ती आपल्या कलेद्वारे कोरोनाविषयी जनजागृती करीत आहे. रडायचं नाही, हरायचं नाही; उलट कोरोनाला हरवायचंय, अशी साद ती जनतेला घालत आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. या संकटाला सर्वचजण सामोरे जात आहेत. शासन, प्रशासन कोरोना जागृती करत आहे. तसेच विविध संस्था, नागरिकही पुढे येत आहेत. असे असतानाच सई बडेकर ही चिमुकली ही कोरोनाच्या जागृतीसाठी काम करत आहे. त्यासाठी ती सुंदर उदाहरणेही देत आहे.
सई एक अत्यंत महत्वूपर्ण उदाहरण देत असते. ते म्हणजे आईच्या गर्भात आपण नऊ महिने थांबलो. आईने आपल्याला पोटातच सांभाळले. व्यवस्थित जगण्यासाठी आणि कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी काही दिवस आपण घरात थांबू शकत नाही का? असा सवालही ती रोखठोकपणे लोकांना विचारत आहे.शत्रू दारात उभा आहे, त्याला संयम आणि गनिमी काव्याने हरवले पाहिजे, असे ती सांगते. इतकेच नव्हे तर ही पाच वर्षांची चिमुरडी सरकारला साथ द्या, असे आवाहनही करत आहे. आरोग्य कर्मचारी, अधिकारी, नर्स हे सर्वजण आपल्यासाठी लढत आहेत. त्यांना आपण घरातच बसून धन्यवाद दिले पाहिजेत, असेही सांगायला ती विसरत नाही.
केवळ पाच वर्षांच्या वयात अचुक शब्दफेक आणि द्यायवा आहे जो संदेश तो ठामपणे देत आहे. त्याबाबतीत आपुलकी आणि उत्कृष्ट हावभाव याचा सुंदर मिलाफ तिच्या सादरीकरणात दिसून येत असल्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपल्या कलेचा वापर प्रबोधनासाठी कसा करावा याचे उदाहरणच तिने घालून दिले आहे.