सातारा : महाराष्ट्रभर अत्यंत शांततेच्या मार्गाने मराठा समाजाचे विराट मोर्चे निघत आहेत. नेता विरहित या मोर्चांना प्रतिसाद मिळतो कसा?, असा प्रश्न अनेकदा पुढे येत आहे. विराट गर्दीला एकत्रित करायचे तर त्याला मायक्रो प्लॅनिंग पाहिजे. हेच प्लॅनिंग अत्यंत सजगपणे होताना दिसतेय. साताऱ्यातील एसटी महामंडळाच्या नूतन इमारतीमधील संपर्क कार्यालयामधून प्लॅनिंगची सूत्रे नियोजनबद्धरीत्या हालत असतात. लोकसभा, विधानसभा निवडणुकांमधील ‘स्पेशल रूम’प्रमाणे प्रयोग एखाद्या मोर्चाच्या निमित्ताने पहिल्यांदाच केला गेल्याचे पाहायला मिळते. साताऱ्यात एसटी विभागीय कार्यालयाचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे. या इमारतीमधील एका मोठ्या गाळ्यात मराठा क्रांती मोर्चाचे संपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयातूनच दि. ३ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या मोर्चाच्या अनुषंगाने नियोजन बैठकांची सूत्रे हालतात. याच कार्यालयाच्या मागच्या बाजूला आणखी छोटी रूम आहे. यामध्ये एका टेबलावर संगणक ठेवण्यात आला आहे. या संगणकाला ई-मेलची व्यवस्था जोडण्यात आलेली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात गावोगावी बैठका घेतल्या जात आहेत. या बैठकांचे नियोजन ग्रामस्तरीय, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्वयंसेवक करत आहेत. प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या बैठकांचे सूक्ष्म नियोजन आहे. गावात झालेल्या बैठकांची माहिती संपर्क कार्यालयापर्यंत पोहोचविली जाते. त्यानंतर इथूनच नियोजनाच्या अनुषंगाने ‘ईमेल, व्हॉट्सअॅप, टेक्स्ट मेसेज’ यांच्या माध्यमातून स्वयंसेवकांपर्यंत माहिती पुरविली जाते. अजून काही दिवस बाकी असल्याने युद्धपातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. (प्रतिनिधी) जिल्ह्यात ४ हजार स्वयंसेवक..मराठा क्रांती मोर्चाचे सातारा जिल्ह्यात ४ हजार स्वयंसेवक आहेत. यांनी स्वत:हून कामाच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत. सर्वच स्वयंसेवकांकडे स्मार्ट फोन असल्याने संपर्क कार्यालयामधील संगणकातून पाठविलेला ‘मेसेज’ एकाच वेळी जिल्ह्यात स्वयंसेवकांना मिळतो. सारं काही नियोजनबद्ध!राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजाने लाखोंच्या गर्दीने मोर्चे काढले. या मोर्चांतील स्वयंशिस्त महत्त्वाची ठरली. इतक्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर आल्यानंतर कायदा-सुव्यवस्थेचा बिलकूल प्रश्न निर्माण होऊ न देता स्वयंशिस्तीमुळे हे मोर्चे अत्यंत शांततेत पार पडले.
कार्यालयातून चार हजार मावळ्यांशी ‘हायटेक संपर्क’ !
By admin | Published: September 22, 2016 11:21 PM