स्वप्नील शिंदे ।सातारा : साताऱ्यातील मटकाकिंग समीर सलीम कच्छी यांच्या बंगल्यावर बुधवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला. यावेळी जप्त केलेले कॉम्प्युटर, प्रिंटर, सीसीटीव्ही कॅमेरा, मोबाईल आदी साहित्य आणि एखाद्या कॉल सेंटरसारखी चालणारी कार्यपद्धत पाहून पोलीसही अवाक् झाले.
सातारा शहर तसेच जिल्ह्यात मटका, जुगाराचे बेकायदेशीर धंदे राजरोसपणे सुरू आहे. पोलिसांकडून त्या मटक्या अड्ड्यावर छापा टाकून रोख रक्कम, आणि जुगाराचे साहित्य जप्त केले जात असते. या साहित्यामध्ये साधा कागद आणि पेन यांचा समावेश असतो. काही ठिकाणी तिकिटांसारखा कागदांचा गठ्ठा आढळतो. मात्र, बुधवारी सातारा पोलिसांनी राजवाडा परिसरातील एका मटका अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी मटकाकिंग समीर कच्छीकडून मोबाईलवर मटका घेतला जात असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार उपअधीक्षक गजानन राजमाने यांच्या पथकाने सैदापूर येथील कच्छीच्या बंगल्यावर छापा टाकला. मात्र, त्यावेळी बंगल्याचा दरवाजाला कुलूप लावले होते.
दरम्यान, पोलिसांना आलेल्या संशयावरून त्यांनी कुलूप आणि दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा बंगल्याची झडती घेतली असता दुसºया मजल्यावर पोलिसांना एलईडी, प्रिंटर, सीसीटीव्ही कॅमेरा, मोबाईल, चार्ज पॉर्इंटचा बोर्ड हे साहित्य आढळून आले. तर तिसºया मजल्यावरील जीममध्ये २३ जण लपले होते. त्या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी समीर कच्छी याचे सातारा जिल्ह्यात मटक्याचे मोठे रॅकेट असल्याचे उघडकीस आले. या ठिकाणावरून एखाद्या कॉर्पोरेट कंपनीच्या कॉल सेंटरसाररखे काम चालते. प्रत्येक अड्ड्यावर मोबाईलद्वारे फोन करून त्या ठिकाणचा आकडा घेतला जातो. मिळालेली रक्कम काहीवेळात त्या ठिकाणी पोहोचते. तसेच दिवसभराचे कलेक्शनही या ठिकाणी येत असते, असे तपासात निष्पन्न झाले आहे.मटक्यासोबत सायबर क्राईमचाही गुन्हासातारा जिल्ह्यात मटका कारवाईमध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम ४ व ५ किंवा १२ (अ) नुसार कारवाई केली जात होती. मात्र, आरोपींनी मोबाईल व इंटरनेटचा वापर केल्याने साताºयात पहिल्यांदा मटका जुगारासोबत माहिती व तंत्रज्ञान कलम लावण्यात आले.जिल्ह्यातील मटका अड्ड्याचा आढावा घेतला जात होता. मोबाईल व सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून त्याची नोंद करून प्रिंट काढली जात होती. छापा कारवाईत पोलिसांनी कच्छीच्या बंगल्यातून सुमारे टेम्पोभर मटका आणि त्यासंबंधी माहितीचे कागद बाहेर आणून जप्त केले.पोलिसांना मिळेना पंच..पोलीस मटका अड्ड्यावर छापा टाकताना त्यांना दोन पंचांची गरज असते. भांडणे, मारमारी आदी गुन्ह्यांमध्ये पोलिसांना सहज पंच व साक्षीदार मिळत असतात. मात्र, मटका आणि दारू अड्ड्यावरील छाप्यात पोलिसांना पंच मिळत नाहीत. त्यामुळे अटकेतील आरोपींची लगेच सुटका होते.