लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोविडकाळात बजेट स्कूल अडचणीत आल्या. त्यात शाळेची मान्यता रद्द झाल्याने परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन सराह लिना शाळेची मान्यता रद्द करण्याच्या शासन निर्णयाला स्थगिती देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक एल. एन. खंडागळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
याबाबत शाळेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सदर बझार परिसरातील लेडीज एज्युकेशन सोसायटी संचलित सराह लिना शाळा गेल्या २० वर्षांपासून सुरू आहे. समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी या शाळेची स्थापना करण्यात आली होती. तांत्रिक कारणे दाखवून शाळेची मान्यता रद्द करण्यात आल्याने पालकांमध्ये कमालीची अस्वस्थता होती. शाळेने ५ जुलै रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शासनाच्या या निर्णयावर स्थगिती दिल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी प्रशिक्षित शिक्षक नसणे व शाळेत आवश्यक भौतिक साधनांची कमतरता असल्याने मान्यता रद्द करण्यात आलेल्या सराह लिना शाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश शिक्षण विभागाने काढले होते.
कोट :
शाळेची मान्यता रद्द झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मुलांचे शैक्षणिक भविष्य अंधकारमय झाल्याची भावना झाली. मागचे आठ दिवस चिंतित व संभ्रमात गेले. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने पालकांना दिलासा आणि शाळा व्यवस्थापनाला बळ दिले आहे.
- संजय जाधव, पालक