सातारा : सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात पसरलेल्या माढा लोकसभेसाठी सहा विधानसभा मतदारसंघातील मतदार आपला हक्क बजावणार असून १५ मार्चपर्यंत नोंदणी झालेले १९ लाख ८० हजार मतदार आहेत. यामधील सर्वाधिक ३ लाख ४८ हजार मतदार हे माण विधानसभा मतदारसंघातील आहेत. यानंतर माळशिरसचा दुसरा क्रमांक लागतो. माढा लोकसभा मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आला. आताची निवडणूक ही मतदारसंघासाठी चाैथी ठरणार आहे. या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, सांगोला आणि माळशिरस या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तर सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण हे दोन विधानसभेचे मतदारसंघ येतात.
मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर पहिली निवडणूक राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिकंली होती. तर दुसऱ्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांनी विजय मिळवलेला. शरद पवार हे पुणे जिल्ह्यातील तर मोहिते-पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. तर २०१९ च्या तिसऱ्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील फलटणच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी विजय मिळवला. त्यामुळे या मतदारसंघात प्रथमच कमळ फुलले. आताची ही चाैथी निवडणूक होत आहे.
या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेले आहे. तसेच मतदारांची आकडेवारीही समोर येत आहे. त्यानुसार माढा मतदारसंघात १५ मार्चपर्यंत नोंदणी असलेले १९ लाख ८० हजार ८५९ मतदार आहेत. तरीही उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दहा दिवसांपर्यंत मतदार नोंदणी करता येते. त्यामुळे आणखी काही मतदारांचा आकडा वाढलेला आहे. या निवडणुकीसाठी सर्वाधिक मतदार हे माण विधानसभा मतदारसंघातील आहेत. माणध्ये ३ लाख ४८ हजार २०५ मतदारांची नोंद झालेली आहे. त्यानंतर माळशिरसमध्ये ३ लाख ३५ हजार ८२३ मतदार आपला हक्क बजावणार आोत. तर माढा विधानसभा मतदारसंघात ३ लाख ३५ हजार ४५०, फलटण ३ लाख ३४ हजार ८५५, करमाळा ३ लाख १६ हजार ७४५ आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात ३ लाख १० हजार ५१ मतदार हे १५ मार्चपर्यंत नोंद झालेले आहेत. यावरुन माढा लोकसभेसाठी ६ लाख ८२ हजार मतदार हे सातारा जिल्ह्यातील असणार आहेत हे स्पष्ट झालेले आहे.८५ वर्षांवरील ३१ हजार मतदार... -माढा लोकसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील ३१ हजार ७१२ मतदार आहेत. करमाळा विधानसभा मतदारसंघात ५ हजार २१२, सांगोला ४ हजार ३३४, माळशिरस विधानसभा मतदारसंघ ५ हजार ८, फलटणमध्ये ५ हजार ९४६ आणि माण विधानसभा मतदारसंघात ५ हजार ८२७ मतदार तसेच माढ्यातही पाच हजारांवर मतदार हे ८५ वर्षांवरील आहेत. तर आताच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने ८५ वर्षांवरील हाचाल न करता येणाऱ्या मतदारांसाठी घरी मतदानाची व्यवस्था केलेली आहे.