क-हाड : ‘लव्ह जिहाद’ निषेध रॅलीला परवानगी नाकारली म्हणून पोलीस खात्याविरोधात हिंदू एकता संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (20 जानेवारी) सकाळी क-हाडच्या मुख्य चौकात आंदोलन सुरू केले आहे. हिंदू एकता संघटनेच्या वतीने क-हाड ते सातारा या मार्गावर २० व २१ जानेवारी रोजी पदयात्रा आयोजित केली होती. त्याला पोलिसांनी परवानगी नाकारली. याच्या निषेधार्थ क-हाडातील दत्त चौकात हिंदू एकता संघटनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले.
यावेळी हिंदू एकताचे प्रांताध्यक्ष विनायक पावसकर, हिमाचल प्रदेश येथील स्वामी बलराम दास महाराज, विक्रम पावसकर, रुपेश मुळे, चंद्रकांत जिरंगे, राहुल यादव, महेश जाधव यांच्यासह हिंदू एकताचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित आहेत. विनायक पावसकर म्हणाले, ‘सनदशीर मार्गाने काढण्यात येणा-या या पदयात्रेचे तीन महिन्यांपूर्वी नियोजन केले.
पदयात्रा ही कोणताही धर्म, जात, पंथाविरुद्ध नसून त्यात कोणताही राजकीय संघटना सामील नव्हती. तरीही पोलीस प्रशासनाने अचानक या पदयात्रेस परवानगी नाकारली. पोलिसांनी परवानगी का नाकारली, यामागचा हेतू व त्याचे कारण मिळणे गरजेचे आहे. पोलिस प्रशासनाने पदयात्रेसाठीची परवानगी नाकारून आमच्या धार्मिक व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला आहे.’ दरम्यान, उपोषणस्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, क-हाड शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी भेट दिली. विनायक पावसकर यांच्याशी उपोषणाबाबत चर्चा केली.