आदर्की : फलटण तालुक्यातील आदर्की महसुली मंडलात हिंगणगाव येथे प्रभाग एकमध्ये तासभर मशीन बंद पडली होती. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर बिबी, कापशी, आळजापूर, कोऱ्हाळे, वडगाव, मुळीकवडी येथे उत्साहात व शांततेत मतदान पार पडले.
फलटण पश्चिम भागातील हिंगणगाव ग्रामपंचायतीमध्ये चार प्रभाग असून, प्रभाग एकमधे धनगरवाडा येथे प्रथमच नवीन मतदान केंद्र झाले आहे. या ठिकाणी मेंढपाळ लोक जादा असल्याने बाहेरगावी असतात. यावर्षी घराजवळ मतदान केंद्र असल्याने सकाळी मतदान सुरू होण्याअगोदरच मतदारांनी रांगा लावल्या होत्या. सकाळी दहा वाजता दीडशे मीटर रांग लागली होती. सकाळी अकराच्या सुमारास मशीनमध्ये बिघाड
झाला. सुमारे तासभर मतदान केंद्र बंद होते. त्यामुळे मतदार उन्हात ताटकळत उभे होते. दुसरी मशीन आणल्यानंतर मतदान सुरळीत सुरु झाले.
हिंगणगावात तीन प्रभागात मतदान शांततेत पार पडले.
बिबी येथे तीन प्रभागांपैकी एका प्रभागात वाडीवस्तीवरील मतदार जादा असल्याने रांगा लागल्या होत्या. बिबी येथे वृध्द महिला, पुरूष व तरुणांनी मास्कचा वापर करून मतदानाचा हक्क पार पाडला. आळजापूर येथे तीन प्रभागांपैकी एका प्रभागामध्ये तीन चार मोठ्या वस्त्या असल्याने रांगा लागल्या होत्या. घाडगेवाडी, मुळीकवाडी, वडगावमध्ये एका जागेसाठी, तर कोऱ्हाळे येथे दोन प्रभागात तीन जागांसाठी निवडणूक शांततेत पार पडली.