कातरखटाव : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केल्यामुळे रोजंदारी, मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांना ‘ना काम आहे ना दाम,’ यामुळे दोनवेळच्या खाण्यापिण्याचा प्रश्न कठीण बनला आहे. अनेकांचे जगणे मुश्किल झाल्यामुळे रोजंदारीवर पेटणाऱ्या चुलीवर जणू पाणी पडल्याचे चित्र आहे.
सलग दोन वर्षे झाली, शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाची लाट पसरली आहे. कोरोना महामारीला आटोक्यात आणण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सध्या लसीकरण मोहीम राबवली जात असली, तरी लॉकडाऊन हाच मुख्य पर्याय बनल्याने शहरं, गावं, दैनंदिन काम, रस्ते बंद ठेवून संसर्ग टाळण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे अनेकांचा रोजंदारीवर चालणारा उदरनिर्वाह कठीण बनत असल्याने अनेक समस्या भेडसावत आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
या ग्रामीण भागात अनेक कुटुंब अशी आहेत की, दैनंदिन मोलमजुरी केल्याशिवाय पोटाची खळगी भरु शकत नाहीत.
लॉकडाऊन, संचारबंदी, नाकेबंदी या कडक निर्बंध काळात सर्व व्यवसाय ठप्प झाल्याने फायनान्सवाले दारात येऊन बसणार, बँक-पतसंस्थावाले नोटीस पाठवणार, महावितरणवाले तुमचं एवढं वीजबिलं थकीत आहे भरा नाहीतर कनेक्शन तोडतो म्हणणार, या समस्यांना सामोरे जावे लागणार असल्याने संकटात भर पडणार आहे. व्यवसायासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते भरणे कठीण होऊन बसले आहे.
हाताला काम नसल्यामुळे सर्वसामान्यांचं जगणं मुश्कील झालं आहे. यामुळे बँका-पतसंस्थेचे हप्ते, व्याज थांबणार का, वीजबिल माफ होणार का, मायबाप सरकारकडून रोजंदारी करणाऱ्यांना शासकीय मदत मिळणार का, असे अनेक प्रश्न सध्या ग्रामीण भागात पुढे येत आहेत.
कोट
पेट्रोल-डिझेल पाठोपाठ गॅस सिलिंडरच्या किमती भरमसाठ वाढल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. लॉकडाऊनमुळे वडापावची गाडी बंद पडली. त्यामुळे आता खेड्यापाड्यात फिरून भाजीपाला विकत आहे. वाढती महागाई व खाद्यवस्तूंचे दर आवाक्याच्या बाहेर गेल्याने घरखर्च चालवायचा कसा, असा प्रश्न पडला आहे.
- मोहन धनवडे, कातरखटाव
चौकट
स्माईल प्लीज म्हणणारे छायाचित्रकार अडचणीत...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक उद्योजकांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. सर्वच व्यवसायाला खीळ बसली आहे. बँकांचे कर्ज काडून लाखो रुपयांचे महागडे कॅमेरे घेऊन वर्षभर लग्नसराईच्या प्रतीक्षेत असलेले छायाचित्रकार आणि व्हिडीओग्राफर्सना सलग दुसऱ्या वर्षी ऐन हंगामात व्यवसाय बंद ठेवावा लागला आहे. ‘स्माईल प्लीज’ म्हणून इतरांच्या जीवनात नेहमी आनंद देणाऱ्या, हसवणाऱ्या अनेकांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे.