सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीतून दररोज हजारो लोक प्रवास करत असतात. यामध्ये महिला अन् तान्हुल्यांचे प्रमाण जास्त असते. मात्र गर्दीमुळे तान्हुल्यांना माता स्तनपान करू शकत नाहीत. हीच समस्या लक्षात घेऊन एसटी महामंडळाने हिरकणी कक्ष स्थापन केला. पण त्याचा म्हणावा त्या प्रमाणात वापर केला जात नाही. त्यामुळे त्या कक्षाचा खरा हेतू साध्य होत नाही.
राज्य परिवहन महामंडळाची एसटी ही सर्वसामान्यांची सारथी बनली आहे. नोकरीच्या ठिकाणी जाणे, पै-पाहुण्यांकडे जाण्यासाठी एसटीचाच आधार घ्यावा लागतो. त्यामुळे दररोज हजारो प्रवासी एसटीने ये-जा करतात. साताऱ्यासारख्ये बसस्थानक चोवीस तास गजबजलेले असते.
जास्त तासांचा प्रवास असेल तर तान्हुली मुलं भुकेने रडत असतात. त्यांना स्तनपान करण्याची गरज असते. मात्र प्रतीक्षालयात पुरुष, महिला एकत्रच असतात. त्यामुळे स्तनपान करण्याचा मातांना संकोच वाटतो. दुसरीकडे तान्हुल्यांची अवस्था पाहून त्यांना राहवत नाही. त्यामुळे हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला. याबाबत ध्वनिक्षेपकावरून उद्घोषणा केली जाते. कक्षाच्या बाहेर स्तनपान करणाऱ्या महिलेचे चित्र रेखाटले आहे. मात्र या कक्षेचा म्हणावा त्या प्रमाणात वापर केला जात नाही. त्याचा गरजू महिलांनी वापर करणे गरजेचे आहे.
चौकट
रोज तीन-चार जणींकडून लाभ
हिरकणी कक्ष सुरू असल्याबद्दल ध्वनिक्षेपकावरून उद्घोषणा केली जाते. ती ऐकून ज्या महिलेला या कक्षाचा वापर करायचा आहे, ती इतरत्र शोधून कक्षेत येते. जर कोणाच्या लक्षात न आल्यास महिला वाहक, अधिकाऱ्यांकडे चौकशी करुन त्या ठिकाणी येऊन, या कक्षाचा वापर केला जातो. मात्र अशी संख्या दिवसाला केवळ तीन ते चार आहे.
सहा वर्षांपासून कक्ष सुरू
सातारा मध्यवर्ती बसस्थानकात जानेवारी २०१४ मध्ये हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला होता. याठिकाणी सुरूवातीस एक महिला लिपिक त्या ठिकाणी त्याचे काम करत होती. कोण महिला आली, तर तिला बसण्यासाठी सोय केली होती. आता या खोलीचा वापर केवळ हिरकणी कक्षासाठीच करण्यात येत आहे.
कक्षाला प्रतिसाद
सातारा मध्यवर्ती बसस्थानकात सुरू असलेल्या हिरकणी कक्षाला स्तनदा मातांमधून प्रतिसाद मिळत आहे. सध्या तरी दररोज सरासरी तीन-चार जणी कक्षाचा वापरत करीत असल्या तरी, त्याचे प्रमाण भविष्यात नक्कीच वाढू शकते.
- रेश्मा गाडेकर
स्थानक प्रमुख, सातारा.
०३जावेद०१
सातारा मध्यवर्ती बसस्थानकात स्तनदा मातांसाठी या ठिकाणी हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. (छाया : जावेद खान)