सातारा : साताऱ्याचे हार्ट आॅफ सिटी ठरलेला पोवई नाका आपली कात टाकत असतानाच सध्या या परिसराचा चेहरा मोहरा बदलणाºया गे्रड सेपरेटरचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या गे्रड सेपरेटरमुळे पोवई नाक्याचा जुना चेहरा कायमचा पुसला जाणार आहे. साताºयाला असणारा ऐतिहासिक वारसा पाहता पोवई नाका येथे सुरू असलेल्या या खोदकामादरम्यान उजाळा मिळाला असून, मरिआई कॉम्प्लेक्स ते आयडीबीआय बँक (जुनी युनायटेड वेस्टर्न बँक) या परिसरात एक प्राचीन भुयार आढळले असून, या भुयाराची दोन्ही बाजूंची प्रवेशद्वारे मोकळी झाल्याने हा काळाच्या पडद्याआड जाणारा ठेवा उघड झाला आहे.साताºयाचे पूर्वीचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या पोवई नाक्याला या ठिकाणी असलेल्या पाणपोईवरून पोवई नाका हे नाव मिळाले. सध्या या परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे या परिसराला शिवाजी सर्कल असेही म्हटले जाते. आठ रस्ते एकाच ठिकाणी एकत्र येणारे जुन्या काळातील हे एकमेव ठिकाण असावे. याच परिसरात सध्या ग्रेड सेपरेटरचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या ग्रेड सेपरेटरचाच एक भाग असलेला शहरातून येणाºया रस्त्यावर खुदाईचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम सुरू असताना रस्त्यापासून खाली सुमारे अडीच ते तीन फुटांवर मरिआई कॉम्प्लेक्स ते आयडीबीआय बँक (जुनी युनायटेड वेस्टर्न बँक) यादरम्यान दक्षिण-उत्तर असे संपूर्ण दगडी बांधकाम असलेले भुयार आढळले आहे.सुमारे अडीच ते तीन फूट रुंद व तेवढीच उंची असलेले हे भुयार संपूर्ण दगडी आहे. या भुयाराचे नेमके प्रयोजन काय असावे? याबाबत अनेक शक्यता व्यक्त होत आहेत. सध्या ज्या ठिकाणी आयडीबीआय बँक आहे. त्याठिकाणी साधारणपणे १९७१ पूर्वी जी. पी. सातारवाला या पारशी गृहस्थाचा दिलबहार नावाचा मोठा बंगलाहोता.तर त्या बंगल्याच्या उजव्या बाजूला प्राचीन मरिआई महालक्ष्मीचे जुने पत्र्याचे मंदिर होते. याव्यतिरिक्त पाणपोई आणि त्यानजीक छत्रपती शाहू महाराजांचा रिसालदार दौलतखान यांच्या वंशजांची कबरी एवढेच बांधकाम याठिकाणी होते. खुदाईमुळे उजेडात आलेला भुयारी मार्ग हा कदाचित पारशी सातारवाला यांच्या बंगल्यातून बाहेर पडण्याचा मार्ग असण्याची शक्यता असून, दुसरी शक्यता मरिआई कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या महालक्ष्मी मंदिरातून हे भुयार निघाले असल्याची शक्यता आहे.मंदिराचा की बंगल्याचा मार्ग...या भुयाराचे बांधकाम पाहता केवळ पाणी जाण्यासाठी इतके भक्कम बांधकाम जमिनीखाली बांधण्याची शक्यता फारच कमी आहे. महालक्ष्मी मंदिर हे साताºयाची तत्कालीन वेस असलेल्या मारुती मंदिरापासून थोड्याच अंतरावर आहे. कदाचित हे भुयार याच मंदिरातून बाहेर पडण्याचा मार्गही असू शकतो. या परिसरात दुसरे कोणतेही ऐतिहासिक बांधकाम नसल्याने या शक्यतेला जास्त दुजोरा मिळत आहे. सध्याच्या आयडीबीआय बँकेच्या इमारतीच्या जागी असलेला पारशी सातारवाला यांचा बंगला आणि महालक्ष्मी मंदिर ही दोनच जुनी बांधकामे या परिसरात होती आणि भुयाराचा मार्गही या दोन्हींना जोडणारा दुवा असू शकतो. पारशी बंगल्याच्या आधी त्या परिसरात नेमके कोणते बांधकाम होते, याचा पुरावा इतिहास संशोधक शोधत आहेत.
ग्रेड सेपरेटरच्या खुदाईत आढळला ऐतिहासिक भुयारी मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 11:11 PM