सातारा : ऐतिहासिक महत्व असलेली वाघनखे शुक्रवारी (दि. १९) साताऱ्यात येत आहेत. यानिमित्त पुरातत्व विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयात ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.लंडन येथील व्हिक्टोरिया ॲंड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेल्या वाघनखांना ऐतिहासिक महत्व आहे. ही वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणली जाणार असून, ती सर्वप्रथम स्वराज्याच्या चौथ्या राजधानीचा मान असलेल्या सातारानगरीत येणार आहेत. येथील संग्रहालयात ती पुढील दहा महिने इतिहासप्रेमींना पाहता येणार आहे. या वाघनखांची प्रतीक्षा आता संपली असून, शुक्रवारी त्यांचे साताऱ्यात आगमन होत आहे. पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचलनालय, सांस्कृतिक कार्य विभागाकडून या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे.या दिवशी शिवकालीन शस्त्रांचे ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात वाघनखे हे खास आकर्षण असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दुपारी १२.१५ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. तर दुपारी १२.४५ वाजता जिल्हा परिषदेच्या बहुउद्देशीय सभागृहात अन्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुरातत्व विभागाचे संचालक सुजितकुमार उगले, सहायक अभिरक्षक प्रवीण शिंदे, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह लोकप्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. वाघनखांच्या पार्श्वभूमीवर पुरातत्व विभागाकडून सुरक्षेची पुरेपूर खबरदारी घेण्यात आली आहे.
प्रतीक्षा संपली.. ऐतिहासिक वाघनखे येत्या शुक्रवारी साताऱ्यात!
By सचिन काकडे | Published: July 16, 2024 4:41 PM