लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : राष्ट्रीय अधिवेशन भरविण्याचा मान साताऱ्याला मिळाल्याने विविध काळातील इतिहास अनुभविण्याचा आणि त्याविषयी उहापोह करण्याची संधी सातारकरांना मिळणार आहे. मराठवाडा इतिहास परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन १२ व १३ जानेवारीला छत्रपती शिवाजी महाविद्यालयात होणार आहे. यानिमित्ताने इतिहास अभ्यासकांचीही साताऱ्यात मंदियाळी असणार आहे.
या अधिवेशनाच्या पूर्व नियोजनाची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी मराठवाडा इतिहास परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. नारायण सूर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. गोपालसिंह बच्छिरे, सचिव डॉ. नितीन बावळे, कोषाध्यक्ष डॉ. विनोद बोरसे, सहसचिव डॉ. संजय पाईकराव, लातूर जिल्हा प्रतिनिधी डॉ. एम. डी. दामाजीवाले, परभणी जिल्हा प्रतिनिधी डॉ. गणेश माने, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. अनिलकुमार वावरे, इतिहास विभाग प्रमुख प्रो. डॉ. डी. बी. मासाळ आदी सदस्य उपस्थित होते.
नियोजित मराठवाडा इतिहास परिषदेच्या दिवशी ग्रंथ प्रदर्शन, नाणी प्रदर्शन व इतर ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन आणि शिवाजी महाराजांच्या आरमारी जहाज व शस्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक व समकालीन या सत्रामध्ये शोधनिबंधांचे सादरीकरण करण्याची पर्वणी इतिहास अभ्यासक व संशोधक विद्यार्थी यांना लाभणार आहे. परिषदेमध्ये सादर केलेले शोधनिबंध युजीसी केअर लिस्ट मधील जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात येणार आहेत. बैठकीच्या निमित्ताने इतिहास विभाग प्रमुख प्रो. डॉ. धनाजी मासाळ यांनी प्रास्ताविक केले, उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार वावरे यांनी महाविद्यालयासंबंधी माहिती दिली. परिषदेच्या यशस्वीतेसाठी परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. नारायण सूर्यवंशी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी मार्गदर्शन केले. उपस्थितांचे आभर प्रा. मनोहर निकम यांनी मानले.
संभाव्य मराठवाडा इतिहास परिषदेच्या नियोजनासाठीची पूर्व बैठक छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये पार पडली. त्यामध्ये यासंदर्भात शिक्कामोर्तब करण्यात आले. सर्वतोपरी सहकार्य करून अधिवेशन यशस्वीरीत्या होण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करु.- डॉ. राजेंद्र मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य