लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : भुर्इंज येथील ग्रामसभेत दारूबंदीच्या विषयाने भडका उडला असून, सभेत झालेल्या वादावादीचे पर्यवसान मारहाणीत झाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वारागडेवाडी येथील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जितेंद्र वारागडे यांना तसेच त्यांच्या पत्नी, आई व इतर लोकांना दारूच्या नशेत जबर मारहाण केली. हा हल्ला राष्ट्रवादी सभापतींचे पती सुधीर भोसले यांनी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.गीतांजली वारागडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, भुर्इंज येथे १५ आॅगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास ग्रामसभा आयोजित केली होती. या सभेमध्ये पोपट शेवते यांनी भुर्इंज येथील महालक्ष्मी मंदिरासाठी आणलेली वाळू माझे पती जितेंद्र वारागडे यांनी दुसरीकडे नेली असल्याचा आरोप केला. त्यावेळी माझ्या पतीने ही वाळू देवस्थान कमिटीच्या म्हणण्याप्रमाणे मंदिरासाठीच वापरलेली होती, असे सांगितले होते. हे मला माझ्या पतींनी घरी आल्यावर सांगितले. दि. १६ रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास घरात जेवण करीत असताना तीन व्यक्ती दारू पिलेल्या अवस्थेत आले. त्यापैकी एकाने, ‘जितेंद्र वारागडे कुठे आहे, त्याला जिवंत ठेवत नाही.’ त्यावेळी मी त्यांना ‘घरात नाहीत,’ असे म्हटल्यावर त्यांनी माझ्याकडे माझ्या पतीचा मोबाईल नंबर मागितला. तो मी त्यांना दिला नाही. त्यावर त्या तिघांनी मला तसेच माझ्या सासू-सासरे व पतीला घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. तसेच आम्हाला ‘सुधीर भोसले यांनी पाठविले आहे व तुमच्या पतीने मंदिरासाठी टाकलेली वाळू चोरली आहे,’ असे आरोप करीत शिवीगाळ केली. त्यानंतर माझ्या सासºयांना घरासमोरील ओट्यावर ओढत नेऊन त्या तिघांंनी सासू-सासरे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली म्हणून मी माझ्या पतीला फोन करून या प्रकाराची माहिती दिली. तोपर्यंत आजूबाजूचे लोक जमा झाले. माझे पती व त्यांच्यासोबत संजय काळे असे तिथे आले व भांडणे सोडवायला लागले. त्यावेळी त्या तीन व्यक्तींनी काठीने माझ्या पतीच्या उजव्या हातावर व सासूच्या, संजय काळे आणि राजेंद्र वारागडे यांच्या डाव्या हाताच्या करंगळीवर मारहाण केली. त्या तिघांपैकी एक व्यक्ती अंधारातून पळून गेला तर इतर दोघांना जमलेल्या लोकांनी थांबवून ठेवले. त्यावेळी त्या दोघांची नावे वैभव गजानन शेवते (वय २७), सचिन कांता शेवते (२८, दोघे रा. भुर्इंज) व पळून गेलेल्या व्यक्तीचे निम्या ऊर्फ निमेष बाजीराव जाधव, (रा. भुर्इंज) असे असल्याचे समजले. हे तिघेही दुचाकीवरून आले होते.काँग्रेस कार्यकर्त्याकडूनच मारहाणीचा आरोपवैभव गजानन शेवते (वय २७, रा. भुर्इंज) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ग्रामसभेत झालेल्या वाळू चर्चेवरुन अजित वारागडे यांनी ‘आमच्या नदीकाठच्या क्षेत्रातून महालक्ष्मी मंदिरासाठी काढलेल्या वाळूपैकी इतर काही वाळू दुसरीकडे विकल्याबाबत’ जितेंद्र वारागडे यास विचारण्यास गेले असता तिथून मोटारसायकलवरून परत येत असताना जितेंद्र वारागडे याने आम्हाला मोटार सायकलवरून खाली पाडून मारहाण केली. तसेच जितेंद्र वारागडेसोबत त्याच्या घराशेजारील सात ते आठ जणांनीही तिघांना मारहाण केली. यामध्ये सचिन शेवते, निमेश जाधव जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद भुर्इंज पोलीस ठाण्यात झाली आहे.
काँग्रेस कार्यकर्त्याच्या कुटुंबास मारहाणं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:06 AM