कऱ्हाड तालुक्यातून वाळू उपसा तसेच दगडाचे उत्खनन मोठ्या प्रमाणात केले जाते. ते करताना अनेकदा अवैधरित्या केले जात असल्याचेही यापूर्वी तहसील कार्यालयाने केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. पर्यावरणाची हानी होऊन नैसर्गिक साधन सामग्रीचे नुकसान होत असल्याबाबत सामाजिक संघटनांनी तहसील कार्यालयाकडे निवेदनाद्वारे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन प्रांताधिकारी उत्तम दिघे, प्रभारी तहसीलदार आनंदराव देवकर यांच्या पथकाने संबंधित ठिकाणच्या खाणधारकांना आवश्यक कागदपत्रे, परवानग्या तसेच रॉयल्टी भरलेली चलने यांची माहिती जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
नियम डावलून अवैध गौण खनिज उत्खनन करणारे तसेच अवैध वाळूउपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी मंडलाधिकारी, गावकामगार तलाठी यांच्यामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही तहसीलदार देवकर यांनी दिला आहे. दरम्यान, नांदलापूर व कालगाव येथील खाणींवर झालेल्या कारवाईमुळे अवैध गौणखनिज उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महसूल विभागाने कारवाईच्या मोहिमेत सातत्य ठेवल्यास अवैध उत्खननाला चाप बसेल, असे मत सामाजिक संघटनांकडून व्यक्त केले जात आहे.