लॉकडाऊन होण्याच्या भीतीने सोमवारी शहरातील दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी झाली होती. बाजारपेठेतील फक्त किराणा दुकाने सुरू असतानाही रस्ते गर्दीने ओसंडून वाहत होते. त्यामुळे पोलिसांनी गर्दी नियंत्रणासाठी तातडीने हालचाली सुरू केल्या. अत्यावश्यक सेवा वगळता, इतर कोणतेही दुकान उघडू नये, अशा सूचना पोलिसांकडून ध्वनिक्षेपकाद्वारे देण्यात आल्या. मात्र, तरीही अन्य काही दुकानदारांनी आपले व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. मुख्य बाजारपेठेसह शिवाजी क्लॉथ मार्केटमधील काही दुकाने पोलिसांनी सात दिवसांसाठी सील केले. संबंधित व्यावसायिकांना प्रत्येकी तीन हजारांचा दंडही करण्यात आला. त्याबरोबरच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या दुकानांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. विनामास्क वावरणाऱ्या नागरिकांकडूनही दंड वसूल करण्यात आला. शहरात दिवसभर पोलिसांकडून कारवाईचे सत्र सुरू होते. मात्र, तरीही दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत होती.
फोटो : १२केआरडी०४
कॅप्शन : कऱ्हाड बस स्थानक परिसरात विनामास्क वावरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी तब्बल हजार रुपयांचा दंड केला, तसेच दंडाची पावती हातात धरून त्यांना काही काळ रस्त्यानजीक उभे करण्यात आले होते.