दशरथ ननावरे-- खंडाळा तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील शेतकऱ्यांची जीवनवाहिनी म्हणून वीर धरणाच्या उजव्या कालव्याकडे पाहिले जाते. यावर्षी खंडाळा तालुक्यात सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे वीर धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत निम्म्याने कमी झाला आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून शेतीपिकांचे नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांचा आराखडा कोलमडला असून ‘धरणाचे पाणी खोल, शेतकरी झाले हवालदिल’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, धरणात गेल्यावर्षी नोव्हेंबरअखेर ६ टीएमसी पाणी होते. सध्या ३. ५ टीएमसी पाणीसाठा आहे.खंडाळा तालुक्याच्या सीमेवर नीरा नदीवर असणाऱ्या वीर धरणात तालुक्यातील काही भागांची शेती व पिण्याच्या पाण्याच्या योजना अवलंबून आहेत. वीर धरणाची पाणीसाठवण क्षमता ९.७५ टीएमसी एवढी आहे. यावर्षी पाऊसकाळ कमी झाल्याने धरणात नोव्हेंबर अखेरच पाणीसाठा खालावला आहे. गतवर्षी नोव्हेंबर अखेर ६ टीएमसी पाणी शिल्लक होते. मात्र, यावर्षी तो तब्बल निम्म्याने कमी होऊन आजअखेर केवळ ३.५ टीएमसीच पाणी राहिले आहे. त्यामुळे मार्च-एप्रिलमध्ये जी स्थिती असते ती चार महिने अगोदरच निर्माण झाली असल्याने पाण्याची बिकट परिस्थिती उद्भवली आहे.खंडाळा तालुक्यातील भादे, अंदोरी, वाठार बु।।, मोवे, दापकेघर, शेडगेवाडी, कराडवाडी, पिंपरे बु।। बावकलवाडी, रुई यांसह अनेक गावांची शेती वीर धरणाच्या नीरा उजव्या कालव्यावर अवलंबून आहे. याशिवाय काही गावांच्या पिण्याच्या पाणीयोजनाही येथूनच सुरू आहेत. धरणातून कालव्याला पाणी सोडले तरच गावच्या पाणीयोजना सुरळीतपणे सुरू असतात. अन्यथा गावातून पाणीपुरवठा खंडित होतो.वीर धरणावर अवलंबून असलेल्या शेतीत मुख्यत: ऊस, कांदा ही नगदी पिके तर ज्वारी, बाजरी, भुईमूग, हरभरा, कडधान्ये गहू, कापूस, फळबागा अशी शेतीपिके अवलंबून आहेत. सद्य:स्थितीत कांदा आणि ऊस, फळबागा ही पिके व ज्वारीचा हंगाम पार पाडण्यासाठी धरणाच्या पाण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र धरणातीलच पाणी कमी असल्याने कालव्याला सातत्याने पाणी सोडणे अशक्य बनणार आहे. शेतीपिके धोक्यात येण्याची चिन्हे असल्याने लाखोंच्या उत्पादनावर पाणी सोडावे लागेल. या भीतीने या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. याच तालुक्यातील भाटघर धरणातील पाणी गरजेनुसार सोडल्यास वीर धरणाच्या पाणीसाठ्यात भर पडणार आहे. परंतु भाटघर धरणातही सध्या केवळ १५ टीएमसीच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वी हिवाळ्याच्या प्रारंभालाच पाणीटंचाईला सामोरे जावे लागते की काय, अशी परिस्थिती आहे. सध्या ऊसतोड सुरू असली तरी नवीन लागणीचा ऊस आणि कांदा पीक टिकविणे शेतकऱ्यांना अडचणीचे ठरणार आहे. वीर धरणात जर पाणी आले नाही तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येण्याची शक्यता आहे. आमच्या गावची पाणीपुरवठा योजना वीर धरण कालव्यावर अवलंबून आहे. कालव्याला पाणी सुटले तर विहिरीला पाणी येते त्यानुसार पाणीपुरवठा केला जातो. कालव्यास पाणी नसेल तर पाणी योजनेवर परिणाम होतो. आत्ताच दोन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करावा लागतो. त्यामुळे पुढील काळात पाणीटंचाईवर उपाययोजना करावी लागेल.- मीता धायगुडे, सरपंच, वाघोशीसध्या धरणात ३.५ टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी तो ६ टीएमसी होता. भाटघर धरणातील पाणी मागणीनुसार उपलब्ध झाल्यास पाणी नियोजन करता येईल.- एस. एस. शेडगे, वायरलेस आॅपरेटर, वीर धरण व्यवस्थापनया भागातील शेतकऱ्यांच्या शेतीपाण्याच्या योजना विहिरीवरून असल्या तरी विहिरी कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. कालव्याचे पाणी पाझरून विहिरींचा पाणीसाठा वाढतो, त्यावर शेतीपाण्याचे नियोजन करावे लागते. - धनाजी जाधव, शेतकरी
धरणाचे पात्र कोरडे; शेतकरी हवालदिल
By admin | Published: December 04, 2015 10:01 PM