लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना असली तरी त्यातून म्हणावा असा लाभ मिळत नाही. यामध्ये विमा कंपन्याच मालामाल होत असल्याच्या तक्रारी आहेत. गेल्यावर्षी खरिपात शेतकऱ्यांनी विम्यासाठी ४८ लाख रुपये भरले. पण, १६७ शेतकऱ्यांनाच पाच लाख मिळाले. आता वर्षानंतरही भरपाई कितीजणांना मिळणार, याचा अंतिम आकडाच समोर नाही. त्यामुळे पीक विम्याच्या फोलपणात शेतकऱ्यांचा काय गुन्हा, अशी विचारणा होऊ लागलीय.
शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी एक विमा कंपनी कार्यरत आहे. सुरुवातीला अनेक शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतर पैसे मिळाले. पण, त्यानंतर भरपाई मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली. कारण, भरपाई देण्यासाठी अनेक निकष तयार करण्यात आले. यातून भरपाई कमी मिळू लागली. त्यातच आता विमा योजना ऐच्छिक करण्यात आली आहे. भरपाई कमी आणि योजना ऐच्छिक यामुळे विमाधारक शेतकऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे.
सातारा जिल्ह्याचा विचार करता गेल्यावर्षी खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील ३८,६७२ शेतकऱ्यांनी विमा घेतला होता. भात, सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग, कांदा, नाचणी आदी पिकांसाठी हे विमा कवच होते. जिल्ह्यातील ८,२०० हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले. त्यासाठी शेतकऱ्यांनी ४८ लाख ७७ हजार ५१२ रुपये भरले. २३ कोटी ९० लाख रुपये विमा संरक्षित रक्कम झाली. त्यातच गेल्यावर्षी खरीप हंगामातच अतिवृष्टी झाली. यामध्ये फळबागा, सोयाबीन, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, वर्षानंतरही कितीजणांना लाभ मिळणार, हे निश्चित नाही.
गेल्यावर्षीच्या खरीप हंगामावेळी झालेल्या अतिवृष्टीतील नुकसान झालेल्या अवघ्या १६७ शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळाली आहे. ५ लाख ६ हजार ९१२ रुपये मदत या शेतकऱ्यांना मिळाली. आज वर्ष होऊन गेल्यानंतरही आणखी किती शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मिळणार, हेही स्पष्ट नाही. त्यातच राज्य आणि केंद्र शासनांनी आपला हिस्साही दिला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पीक विमा योजनेतील हा फोलपणा शेतकऱ्यांना योजनेपासून दूर नेण्यास भाग पाडत आहे. तसेच शेतकऱ्यांचाही विमा कंपन्यांबाबत नाराजीचा सूर आहे.
........................................
शेतकऱ्यांना असा भरावा लागतो विमा हप्ता (हेक्टरी) ...
पीक शेतकरी हप्ता रक्कम विमा संरक्षित रक्कम
भात ६६० ३३०००
ज्वारी ३२० १६०००
बाजरी २८० १४०००
नाचणी ३२० १६०००
भुईमूग ६३० ३१५००
सोयाबीन ५२० २६०००
मूग ४०० २००००
उडीद ४०० २००००
कांदा १८०० ३६०००
......................................................
शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना असली तरी योग्य यंत्रणा कार्यान्वित नाही. नुकसान होत आहे, त्याप्रमाणात भरपाई मिळत नाही. यामुळे नैराश्य वाढल्याने शेतकरी पीक विमा काढण्याबाबत टाळाटाळ करत आहेत. एकप्रकारे शासनाबरोबरच खासगी विमा कंपन्यांचीही दरोडेखोरी सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. याबाबत उपाययोजना केल्या नाहीत तर शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.
- राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
.......................
नुकसानभरपाई कोणाला मिळते...
अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, चक्रीवादळ, कीड, रोगराई, पावसातील खंड, वीज कोसळणे, नैसर्गिक आग यामुळे पिकांचे नुकसान झाले तर भरपाई मिळते. त्यासाठी विमा कंपनी व राज्य शासनाचे संबंधित अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर पंचनामे केले जातात. त्यावर नुकसानाचे प्रमाण व भरपाई रक्कम ठरवली जाते.
..............................................................................
हप्ता रक्कम अशी आहे...
विमा हप्त्यापैकी खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगाम दीड आणि फळबागांसाठी ५ टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरायची आहे. उर्वरित रक्कम राज्य आणि केंद्र शासन भरते.