लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँक राजकारण विरहित ठेवून बिनविरोध करण्याचा पवित्रा राष्ट्रवादीने घेतला असला तरी सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत तर पॅनेल टाकून लढाई करण्याचा निर्धार काँग्रेस पक्षाने केलेला दिसतो.
शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये असले तरीदेखील त्यांचा प्रभाव लक्षात घेऊन त्यांना सोबत घेण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. सातारा, फलटण व कऱ्हाड तालुक्यांत असल्याने विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर सहकार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील आमदार मकरंद पाटील यांच्यावरही या निवडणुकीची मदार असणार आहे. ‘महाविकास’चा फॉर्म्युला बाजूला ठेवण्याची तयारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे. राखीव मतदारसंघातून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.
सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे रिंगणात उतरणार असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच उमेदवार निश्चित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शब्द अंतिम राहणार आहे. पण, यावेळेस राष्ट्रवादीच्या विरोधात दुसरे पॅनेल उभेच राहू नये, यासाठीची बांधणी सध्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून होणार आहे.
जिल्हा बॅंकेसाठी अनेकांनी ठराव केले आहेत. कच्ची मतदारयादी प्रसिध्द झाल्यानंतरच निवडणुकीसाठी कोण कोण इच्छुक आहेत, हे समजणार आहे. सध्या तरी राष्ट्रवादीने आपल्या काही खेळ्यांबाबत गुप्तता पाळली आहे. तर सर्वसमावेशक पॅनेल उभे करताना राज्यातील सत्तेतील महाविकासाचा फॉर्म्युला बाजूला ठेवण्याचीही तयारी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा दबाव वापरून जिल्हा बॅंकेत संचालकपद मिळविणे तितकेसे सोपे राहिलेले नाही.
जिल्हा बॅंकेच्या मतदारसंघनिहाय मतांची आकडेवारी पाहिली तर सर्वाधिक मते सातारा, फलटण व कऱ्हाड तालुक्यांत आहेत. त्यामुळे येथील नेते आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर तसेच सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर निवडणुकीची मदार अवलंबून आहे. ते ठरवतील त्यांनाच संचालक म्हणून बॅंकेत प्रवेश करता येणार आहे. त्यामुळे या नेत्यांच्या गाठीभेटींवर इच्छुकांनी भर दिला आहे.
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होणार असल्याने हे तिघे जी नावे अंतिम करतील त्यांना संधी मिळणार आहे. जास्तीत जास्त जागा बिनविरोध करण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा भर आहे. भाजपलाही यामध्ये वाटा मिळू शकतो मात्र काँग्रेस थोडक्या जागांवर समाधान मानणार नसल्याने संघर्ष होऊ शकतो.
कोट..
काँग्रेस पक्षाला जिल्हा बँकेतील संचालक पदाच्या ४ जागा सन्मानपूर्वक दिल्या गेल्या नाहीत तर स्वतंत्र पॅनल उभारण्याची तयारी काँग्रेसने केलेली आहे. सोसायटी मतदारसंघातील दोन, बँक व नागरी पतसंस्था तसेच महिला राखीव या चार जागांवर काँग्रेसने दावा केलेला आहे.
डॉ. सुरेश जाधव
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
कोट..
राष्ट्रवादीने जिल्हा बँक राजकारण विरहित ठेवण्याचा प्रयत्न कायमच केलेला आहे. आगामी काळात देखील पक्षविरहित एक चांगले संचालक मंडळ निवडले जाणार आहे. बँकेमध्ये अपप्रवृत्तींना थारा दिला जाणार नाही. राष्ट्रवादीचे राज्य तसेच जिल्ह्यातील प्रमुख नेते याबाबतीत निर्णय घेतील.
- सुनील माने
जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी
कोट...
जिल्हा मध्ये शिवसेनेचे दोन आमदार निवडून आलेले आहेत. मंत्रीपद देखील शिवसेनेकडे आहे. भविष्य काळामध्ये शिवसेना वाढवायची झाल्यास या आमदारांची ताकद गरजेचे आहे. या आमदारांनी ठरवल्यास शिवसेना जिल्हा बँकेत निश्चितपणे शिरकाव करू शकेल.
- चंद्रकांत जाधव
जिल्हाप्रमुख शिवसेना