सातारा : ‘महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार वाढू लागले आहेत. महिला, युवती, तरुणी, बालिकांवर अत्याचार नाहीत, असा एकही दिवस नाही. दररोज अत्याचाराच्या घटना वाढत असतानाही महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि दोन्ही गृहराज्यमंत्री शांत आहेत. त्यांना तोंड उघडायला वेळ नाही. सातारा जिल्ह्यात तर महिलांवरील अत्याचारांची मालिका सुरू आहे. राज्यमंत्री शंभूराज देसाई तुमच्याच जिल्ह्यात अशा घटना घडत आहेत. महिलांवर अत्याचार होत असतानाही तुम्ही तोंड उघडत नाही. तुम्हाला तर गृहमंत्रिपदाचाच विसर पडला आहे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.
चित्रा वाघ या शनिवारी सातारा जिल्ह्यात आल्या होत्या. साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेण्यापूर्वी त्यांनी महाबळेश्वर येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली.
चित्रा वाघ म्हणाल्या, महाबळेश्वर येथे घडलेला सामूहिक अत्याचाराचा प्रकार गंभीर आहे. पोलिसांनी या प्रकरणात सुरुवातील फक्त दोनच नावे घेतली. यात नंतर नावे वाढली मात्र, ही नावे सुरुवातीलाच का घेतली नाहीत. यामध्ये एकूण १३ आरोपी असून त्यापैकी एक वकील आहे. हे दोघेही फरार आहेत. ज्यावेळी सुरुवातीला दोघांना अटक झाली त्यावेळी वकील असणारा पोलीस ठाण्यात उपस्थित होता. मग त्यांची नावे पोलिसांनी एफआयआरमध्ये का घेतली नाहीत. अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार होतो आणि तिचे मूल दत्तक दिले जाते. यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले आणि हे प्रकरण लपवले ते सर्व आरोपीच आहेत. येथे पूजा करताना जंगम आणि वकिलांना कोणी बोलावले? त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांचे कॉल रेकॉर्डही चेक झाले पाहिजेत. बावळेकरांचा एक मुलगा वकील आहे, तो त्याच दिवशी पोलीस ठाण्यात हजर होता. मग त्याला अटक का केली नाही? वकील आणि पूजाअर्चा करणारा या दोघांना अटक करण्यापूर्वी ते दोघे सरकारी वकिलाकडे गेले होते. ज्यांनी ज्यांनी या प्रक्रियेत फोन केले आहेत, त्या सर्वांना सहआरोपी करा, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, ‘महाराष्ट्रातील सरकार मुर्दाड आहे. त्यांच्या नाकात आता वेसण घालणे आवश्यक आहे. राज्यात विकृतीचे मनोबल वाढत आहे. तुम्हाला जर आमचे अश्रू खोटे वाटत असतील तर तसे सांगून टाका. आमदार नीलेश लंके महिला अधिकाऱ्यांना वाटेल तसे बोलतात. त्यांना असा अधिकार कोणी दिला?