मसूर : शुक्रवारपासून संचारबंदी कडक करा, अनावश्य्क गर्दी करणारे, विनाकारण टू व्हिलरवरुन फिरणारे, डॉक्टरकडे निघालो असे बहाणा करत असलेले यांच्यावर कारवाई करा व कोरोणा रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य शासनाने संपूर्ण राज्यभर बुधवारी रात्री ८ वाजलेपासून संचारबंदी हा उपाय लागू केला आहे त्याची कडक अंमलबजावणी करा असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी मसूर येथे गुरुवारी पहाणी दौ-या दरम्यान केले.
कोणताही नियोजित दौरा नसताना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी अचानक सातारा जिल्हा संचारबंदी पहाणी दौरा केला. यावेळी ते मसूर येथे आले होते. यावेळी शिवसेनेचे उपनेते नितिन बानुगडे-पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे ,मसूरचे सरपंच पंकज दीक्षित,उपसरपंच विजयसिंह जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य संग्रामसिंह जगदाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी संगिता देशमुख, प्रांतअधिकारी उत्तम दिघे, डी.वाय.एस.पी. रणजीतसिंह पाटील,उंब्रजचे सपोनि अजय गोरड, मसूरचे पोलिस उपनिरिक्षक प्रविण जाधव, डॉ. रमेश लोखंडे, मंडलाधिकारी श्रीराम गुरव, ग्रामविकास अधिकारी विकास स्वामी, सावळाराम कांबळे, नितिन जगदाळे, माजी उपसरपंच शांताराम मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
देसाई म्हणाले, अत्यावश्यक सेवा आणि किराणा माल, भाजीपाला, दूध वगैरे याव्यतिरिक्त सगळी दुकाने बंद आहेत, आस्थापना बंद आहेत. सकाळपासून सातारा जिल्हयातील मोठया बाजारपेठेच्या गावांची पहाणी केली तिथे सुध्दा ९५ टक्के संचारबंदीचे तंतोतंत पालन झालेले पहायला मिळाले आहे. विनाकारण फिरणारांची संख्या कमी आहे,आस्थापना बंद आहेत. लोक स्वत:हून संचारबंदीचे पालन करताना दिसत आहेत. त्यामुळे निश्चितपणे संचारबंदीच्या नियमांचे सातारा जिल्हयातील ग्रामीण भागात चांगल्या पध्दतीचे पालन होताना दिसत आहे. शासनाच्यावतीने संचारबंदीची अंमलबजावणीसाठी पोलिस विभाग, आरोग्य विभाग, महसूल विभाग या सर्वांनी मिळून काटेकोरपणे नियोजन केले असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
कोट
महाराष्ट्रात कोरोना लसीचा सर्वच ठिकाणी तुटवडा आहे. परंतु दोनच दिवसात सगळीकडे लस उपलब्ध होईल. तसेच रेमडेसिविर इंजेक्शनही उपलब्ध होईल. त्यामुळे कोणीही घाबरण्याचे कारण नाही. सर्वांनी शासनाने दिलेले नियम पाळा व कोरोना हद्दपार करण्यास मदत करा.
शंभूराजे देसाई, गृहराज्यमंत्री
चौकट
कसून चौकशी करा
संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरताना कोणी डॉक्टरकडे निघालो आहे असे म्हणून फाईल दाखवत असेल तर त्या फाईलची नीट तपासणी करा व प्रसंगी ज्या डॉक्टरची फाईल आहे त्यांना फोन करा व त्याची खातरजमा केल्याशिवाय कुणालाही प्रवास करु देऊ नका. तरच कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होईल.
फोटो - मसूर ता. कराड येथील मुख्य चौकात गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, राष्ट्रीय काँग्रसचे जिल्हासरचिटणीस नंदकुमार जगदाळे, सरपंच पंकज दीक्षित,उपसरपंच विजयसिंह जगदाळे व इतर