लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असून, रुग्णांना आता उपचारासाठी बेड मिळणेही दुरापास्त झाले आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक गृहविलगीकरणाचा पर्याय निवडून घरातूनच उपचार घेत आहेत. सातारा शहरात तब्बल ५३९ नागरिक गृहविलगीकरणात असून, त्यांचा दैनंदिन कचरादेखील डेपोतच पडत आहे. सद्य:स्थितीला सर्व कचरा घंटागाडीतच पडत असला तरी पालिकेकडून या कचऱ्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावली जात आहे.
जिल्ह्यासह सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. दररोज हजाराहून अधिक रुग्ण आढळून येऊ लागल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडू लागली आहे. रुग्णसंख्या अधिक असल्याने आरोग्य सेवेवरदेखील प्रचंड ताण वाढू लागला आहे. सरकारी व खासगी रुग्णालय हाऊसफुल्ल असल्याने कोरोनाबाधितांना उपचारासाठी बेडही मिळत नाही. त्यामुळे बहुतांश नागरिक गृहविलगीकरणाचा पर्याय निवडत आहेत. जिल्ह्यासह सातारा शहरातदेखील मोठ्या प्रमाणात नागरिक गृहविलगीकरणातून उपचार घेत आहेत. सध्या सातारा शहरात ५३९ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. पालिकेकडून या रुग्णांचा कचरा संकलित करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था अद्याप केलेली नाही. त्यामुळे या नागरिकांचा कचरा घंटागाडीच पडत आहे.
कोरोनाबाधितांचा कचरा डेपोत आल्यानंतर त्याचे वर्गीकरण केले जाते. ओला कचरा एका खड्ड्यात टाकला जातो, तर प्लॅस्टिक व इतर कचरा जाळण्यासाठी नेचर अँड नीडच्या प्रकल्पात पाठविला जातो. हा कचरा हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई कीट व सुरक्षेची अन्य साधने पालिकेकडून पुरविली जातात. गृहविलगीकरणातील रुग्णांना पालिकेकडून कचरा संकलनासाठी पिवळ्या रंगाच्या पिशव्या दिल्या जाणार आहेत. शिवाय कचरा संकलनासाठी स्वतंत्र घंटागाडीही सुरू केली जाणार आहे. सध्या घरातून उपचार घेणाऱ्या नागरिकांच्या नोंदी घेण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे.
(पॉइंटर)
६१९६ : शहरातील एकूण रुग्ण
५३४७ : बरे झालेले रुग्ण
७३२ : उपचार सुरु असलेले
५३९ : गृहविलगीकरणातील रुग्ण
(पॉइंटर)
६० - कचरा एकत्र करणारे कर्मचारी
४४ - टन ओला कचरा
४ - टन सुका कचरा
(चौकट)
कचर्यातून कोरोना पसरण्याचा धोका कमी
- कोरोनाबाधित व्यक्ती शिंकल्याने अथवा खोकल्याने हवा संक्रमित होते. अशा व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर आपल्याला कोरोना विषाणूची लागण होते.
- गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांचा कचरा जरी घंटागाडीत पडत असला तरी बहुतांश रुग्ण तो कचरा घंटागाडीत टाकण्यापूर्वी निर्जंतुक करतात.
- गेल्या वर्षभरापासून हा कचरा डेपोमध्ये पडत आहे व त्याची विल्हेवाट लावली जात आहे, मात्र अद्याप एकाही आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झालेली नाही.
- त्यामुळे कचर्यातून कोरोना पसरण्याचा धोका कमी संभवतो, असे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
(कोट)
घरातून उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांचा कचरा संकलित करण्यासाठी पालिकेकडून स्वतंत्र घंटागाडीची व्यवस्था केली जाणार आहे. हा कचरा हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही सुरक्षेची साधने वेळोवेळी पुरविली जातात.
- अनिता घोरपडे, आरोग्य सभापती
(डमी न्यूज : मेल)