वेळे : तीव्र पाणीटंचाईच्या निषेधार्थ चांदकमधील महिलांनी रविवारी सायंकाळी साडेसात वाजता ग्रामपंचायत कार्यालयाजवळ हंडा मोर्चा काढला. यावेळी ग्रामस्थांनी एकत्र येत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. महिलांनी हंडामोर्चा काढत निषेध व्यक्त केला.
चांदक हे गाव वाई तालुक्याच्या पूर्वेकडील भागात मोडते. या गावाची पाणीसमस्या तुलनेने माण, खटाव तालुक्याच्या बरोबरीने आहे. दर वीस दिवसांनी येथे पाणीपुरवठा होत आहे. प्रत्येक उन्हाळ्यातच ही समस्या निर्माण होते. आजपर्यंत निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीनी या गावाकडे कसलेही लक्ष दिले नाही. फक्त निवडणुकीपूरताच येथील लोकांचा वापर केला जातोय. त्यामुळेच आम्ही सर्व ग्रामस्थांनी व महिलांनी एकत्र येत यापुढील काळातील सर्वच निवडणुकांवर सामूहिक बहिष्कार टाकत आमच्यावर होणाºया सततच्या अन्यायाविरुद्ध लढा देण्याचे ठरविले आहे,’ अशा भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्या.
गावातील प्रत्येक माणूस पाणी शोधत वणवण भटकत आहे. महिलांना पाण्यासाठी दूर अंतरावर पायपीट करावी लागते. त्यामुळे मानदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी यासारखे शारीरिक आजार महिलांना जडत आहेत. शिवाय एवढी पायपीट करून आणलेले पाणी गरजाही भागवू शकत नाही अशीच परिस्थिती येथे निर्माण झाली आहे.
चांदकची लोकसंख्या अठराशे असून पाणीपुरवठा टाकीची क्षमता साठ हजार लिटर आहे. या गावाला दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. या दोन टँकरमधून येणारे पाणी टँकरच्या गळतीमुळे कमी मिळते. जनावरांचे सुध्दा पाण्यासाठी हाल होत आहेत. या गावापासून दोन किलोमीटर अंतरावर मयुरेश्वर येथे कवठे-केंजळ योजनेचे पाणी येते. परंतु चांदकपर्यंत ते पोहोचण्यासाठी काहीच उपाययोजना करण्यात आली नाही. आपल्या तालुक्यातील पाणी अगदी बारामतीपर्यंत पोहोचते; पण तालुक्यातील गावेच दुष्काळग्रस्त होतात. यावर लवकर तोडगा काढून हा पाणीप्रश्न मिटवला पाहिजे.