लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पुणे जिल्ह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना बदनाम करून त्यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवण्याचे षडयंत्र रचणार्या साताऱ्यातील एकाला सातारा तालुका पोलिसांनी सोमवारी अटक केली.
सोमनाथ दिलीप शेडगे (रा. सातारा) असे अटक झालेल्याचे नाव असून अजून दोघेजण फरार आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, आमदार दिलीप मोहिते पाटील यांना बदनाम करून त्यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवायचे आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचे असा डाव शैलेश शिवाजी मोहिते-पाटील, राहुल किसन कांडगे, सोमनाथ दिलीप शेडगे या तिघांनी एका युवतीच्या मदतीने आखला होता. मात्र, संबंधित युवतीनेच या प्रकाराची माहिती आमदारांचा पुतण्या मयूर साहेबराव मोहिते-पाटील यांना दिली होती. यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला. पोलीस या संशयितांचा शोध घेत होते. यापैकी सोमनाथ शेडगे याला अटक करण्यात आली आहे. अन्य दोघांच्या शोधासाठी साताऱ्यातून दोन पथके पुण्याला रवाना झाली आहेत.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सजन हंकारे हे करीत आहेत.