फलटण : यापूर्वी हनिट्रॅपच्या गुन्ह्यात अटक केलेल्या एका टोळीवर आणखी एक हनिट्रॅपचा गुन्हा दाखल झाला असून, एका व्यापाऱ्याकडून २ लाखांची खंडणी जबरदस्तीने घेतल्याने त्या व्यापाऱ्याच्या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात दुसरा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी पीडितांना तक्रार देण्याचे आवाहन केले आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, दि. १७ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजण्याच्या सुमारास, महिला आरोपीने ‘गोळी, भुस्सा घेण्याकरिता १० हजार ॲडव्हान्स देण्याचा आहे व मला तुमच्याशी बोलायचे आहे,’ असा बहाणा केला व पीडित व्यक्तीचा मोबाईल नंबर घेतला नंतर पीडित व्यक्तीस वारंवार फोन करून, मुद्दाम लगट करून, फलटण येथील एका लॉजवर नेले व रूमचा दरवाजा महिलेने लावला नंतर महिलेने बाथरूममध्ये जाऊन कोणाला तरी फोन केला, काही वेळाने रूमचा दरवाजा जोरजोरात वाजवल्याने पीडित व्यक्तीने दरवाजा उघडला असता राजू बोके व त्यांचे चार साथीदार तेथे आले व त्यांनी पीडित व्यक्तीस लॉजचे जिन्याने खाली खेचत, मारहाण करत, खाली आणले व जबरदस्तीने गाडीत बसविले. गाडी आरोपी चालवित होता व त्याचे शेजारील सीटवर पीडित व्यक्ती यांना बसविले होते व इतर इसम, महिलेसह त्याच गाडीत बसले. आरोपी गाडीतदेखील पीडित व्यक्तीस मारहाण करून, तुझ्याविरुद्ध अत्याचाराची तक्रार देतो, असे म्हणाले.
नंतर आरोपी किसान ॲग्रो कंपनीसमोर गाडी घेऊन गेले व तेथे पीडित व्यक्तीस सर्वांनी हाताने लाथाबुक्यांनी मारहाण, दमदाटी करून ५ लाखांची मागणी केली. पीडित व्यक्तीचे मित्र या ठिकाणी आले व बाब मिटवून घ्या, असे म्हणून २ लाख रुपये दिल्याची फिर्याद पीडित व्यक्तीने दिली असून, त्या अनुषंगाने राजू बोके इतर चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एन. आर. गायकवाड करत आहे. दरम्यान, या टोळीने अनेकांना हनिट्रॅपच्या माध्यमातून लुटले असून, पीडितांना निर्भयपणे पोलिसांत येऊन तक्रार द्यावी, तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक भरत किंद्रे यांनी केले आहे.
(चौकट)
अनेक नावे बाहेर येण्याची शक्यता...
या टोळीने हनिट्रॅपमध्ये अनेकांना अडकवले असून, टोळीच्या अटकेने या टोळीशी संबंधित अनेकांचे धाबे दणाणले आहेत. आपले नाव येणार नाही ना याची धास्ती अनेकांना लागली आहे. आणखी सखोल पोलिसांनी तपास केल्यास या टोळीशी संबंधित अनेकांची नावे बाहेर येणार आहेत.