रामापूर : पाटण तालुक्यावर सह्याद्री कोपला. या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या लोकांच्या मदतीला माणुसकीही धावली; पण या सह्याद्रीच्या डाेंगरांना काय मिळाले. सह्याद्रीलाही मदतीची आस लागली आहे. जनजीवन उद्ध्वस्त झाले हे खरे; पण त्यापेक्षा जास्त नुकसान हे सह्याद्रीतील डोंगरांचे झाले आहे. पाऊस आणि सह्याद्रीचे नाते खूपच गोड आहे. सह्याद्री म्हटले की, समोर उभा राहतो स्वराज्याचा इतिहास.
या इतिहासाचे काही साक्षीदार आजही तालुक्यात उभे आहेत. हा सह्याद्री जरी राक, आडदांड असला तरी तो फिरस्त्यांसाठी एक अद्भुत असा ग्रंथच. सह्याद्रीच्या कुषीत तर जैवविविधतेचे भांडार आहे. तालुक्यातील याच सह्याद्रीच्या डोंगरावर पावसाळ्यात तर स्वर्गच अवतरतो. एरवी रुक्ष वाटणारा हा सह्याद्री पावसाळ्यात हिरवा शालू नेसून यौवनात पदार्पण करतो. या दिवसांत तालुक्यातील कोणत्याही कोपऱ्यात उभे राहा बघणाऱ्याच्या डोळ्यांचे पारणे फिटल्याशिवाय राहणार नाही. अतिवृष्टीने तालुक्याच्या वैभवात भर घालणारे सह्याद्रीचे डोंगर खचले आहेत; पण या डोंगरांच्या खचण्याचा अभ्यास केला तर तज्ज्ञांच्या मते, काही कारणे समोर येतात. ते म्हणजे प्रचंड वृक्षतोड, निर्सगात मानवाच्या वाढलेल्या हस्तक्षेपाबरोबरच विकासाची अवास्तव संकल्पना यामुळे सह्याद्री खचत आहे. या खचलेल्या सह्याद्रीला उभे करण्यासाठी वृक्ष लागवड आणि संर्वधन करणे गरजेचे आहे. सह्याद्रीच्या मदतीसाठी झाडे लावूया आणि सोबत पर्यंटनाचा आनंद घ्या; पण पर्यावरणाचे संवर्धन पण करूया.
चौकट
तालुक्यातील भूस्खलनाने बाधित कुटुंबीयांना मदत येते; पण कोसळलेल्या सह्याद्रीच्या डोंगरांना मदत म्हणजेच कोसळेल्या सह्याद्रीच्या डोंगरात वड, पिंपळ, चिंच यासोबत वनऔषधी वनस्पती लावून पर्यावरणाचे संर्वधन करूया हीच खरीच सह्याद्रीला मदत ठरेल.