सातारा : शेतकऱ्यांना हवामानाची माहिती देण्यासाठी केंद्र शासनाने विकसित केलेल्या किसान अॅपची असून अडचण आणि नसून खोळंबा अशी स्थिती आहे. कारण, आता नुकतेच चक्रीवादळ येऊन गेले तरी त्याची माहिती मिळाली नाही. त्यातच अनेक शेतकऱ्यांकडे किसान अॅपही नाही. हवामान अंदाजासाठी अनेक शेतकरी खासगी संस्थांच्या अॅपवर अवलंबून आहेत.
जगातील प्रगत तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा आणि वादळ, वाऱ्यामुळे होणारे संभाव्य नुकसान टळावे, या हेतूने विविध अॅप विकसित करण्यात आली आहेत. त्यापैकीच हे एक किसान अॅप आहे. जिल्ह्यात अत्यंत मोजके शेतकरी या ‘किसान अॅप’चा वापर करतात. पण हे अॅप म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अवस्था आहे. याबाबत शेतकऱ्यांनी सांगितले की, अॅपवरून वेळेत संदेश मिळत नाहीत. गेल्या पंधरवड्यात तर तौक्ते वादळाचा संदेश आम्हाला आलाच नाही. संदेश आला असता तर विविध उपाययोजना करता येतात. काहीवेळा वादळ, पाऊस येऊन गेल्यावर संदेश येतो. त्यामुळे हे अॅप का वापरायचे, असा प्रश्न पडतो. वेळेत माहिती मिळाली तर वैरण, धान्य, जनावरे संरक्षित ठिकाणी ठेवता येतात. अनेकवेळा हवामानाची माहिती या ‘किसान अॅप’वर मिळतच नाही. त्यामुळे काही खासगी संस्थांच्या अॅपवरील संदेशावर विश्वास ठेवून उपाययोजना करण्यात येतात.
चौकट :
किसान अॅपवरून ही माहिती मिळते...
१. किसान अॅपवरून हवामान, वादळ, अवकाळी पाऊस, पीक पेरणी, विजांचा कडकडाट आदी माहिती मिळते.
२. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसह पीककर्ज, पीकविम्याच्या अनुषंगाने माहिती मिळते.
३. शेतीविषयक शासनाच्या योजना, अनुदाने, अर्ज करण्याची प्रक्रिया यांचीही माहिती मिळते.
४. जनावरांच्या आजाराच्या साथी, पिकांची मशागत, काढणी, पिकांवर पडणारे रोग व त्यावर औषधे यांचीही माहिती दिली जाते.
चौकट :
माहिती वेळेत मिळाली तरच फायदा...
- किसान अॅपवरून शेतीविषयक माहिती व सूचना वेळेत मिळाल्या तरच फायदा होतो.
- वादळी, पाऊस विजांचा कडकडाट यांची माहिती किमान काही तास अगोदर मिळाली तरच धान्यसाठे, जनावरांचे संरक्षण करता येते.
- पिकांवरील कीड, जनावरांचे आजार आदींची माहिती योग्यवेळी मिळाली तर औषधोपचार करता येतो. पिकांचा बचाव करणे शक्य होते.
चौकट :
अॅपवरून माहिती अनेकवेळा मिळतच नाही...
कोट :
किसान अॅप हे स्वतंत्र अॅप आम्ही वापरत नाही. काही खासगी संस्थांच्या अॅपचा वापर करतो. त्यावरून वेळेत मेसेज येतात. काही शेतकरी किसान अॅप वापरत होते. पण, त्यावरून सूचना योग्य वेळी मिळत नाहीत. वादळ, पाऊस संपल्यावर मेसेज येतात. यामुळे शेतकऱ्यांनी अॅप डिलीट केली आहेत. तौक्ते चक्रीवादळाचाही उशिरा मेसेज आला.
- राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना
कोट :
मागील १५ दिवसांपासून जोरदार अवकाळी पावसाचे इशारे मिळाले. पण, तोपर्यंत पाऊस सुरु झालेला होता. किसान अॅपऐवजी आम्ही अन्य खासगी कंपन्यांच्या मेसेजवर विश्वास ठेवत आलो आहोत. त्याचा फायदाही शेतकऱ्यांना होताना दिसून येत आहे. त्यांच्याकडून काही तास अगोदर किंवा आदल्या दिवशी पूर्वकल्पना मिळते.
- राजाराम पाटील, शेतकरी
.........................
किसान अॅपचा काही दिवसच वापर केला. पण, अनुभव चांगला नव्हता. शिवाय फक्त अॅपवर विसंबून शेती करता येत नाही. सध्या दोन ते तीन अॅपवरून अंदाज घेत राहतो. त्यामुळे नुकसान टाळता येते. शासनाने शेतकऱ्यांसाठी हमखास भरवशाची माहिती देणारे संकेतस्थळ विकसित करायला हवे.
- शामराव पवार, शेतकरी
............................................
खासगी संस्थांच्या अॅपवरून आगाऊ माहिती...
मान्सूनच्या पावसाचे अंदमान बेटावर आगमन झाले आहे. त्यामुळे मान्सून पुढील वाटचाल करत आहे. पण, बंगालच्या उपसागरात एक वादळ तयार होऊन मान्सूनला अडथळा निर्माण करणार आहे. १४ जूनच्या आसपास मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात दाखल होऊन पेरणीला सुरुवात होईल, अशी माहिती खासगी अॅपवरून येऊ लागली आहे. पण, किसान अॅपवर अजून संदेशच नाही. अशामुळे शेतकऱ्यांचा ओढा खासगी अॅपकडेच दिसून येत आहे.
\\\\\\\\\\\\\\\\\