सातारा : एकाच छताखाली सर्वांना व्यवसाय करता यावा, यासाठी पालिकेने लाखो रुपये खर्च करून राजवाड्याजवळ सुसज्ज असे मार्केट उभे केले; मात्र ही ‘अडगळीची जागा नको रे बाबा,’ असं म्हणत फळविक्रेत्यांनी या जागेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे पालिकेचे आलिशान मार्केट अक्षरश: धूळखात पडलंय. विधानसभा निवडणुकीनंतर रस्त्यावर असलेल्या फळविक्रेत्यांना मार्केटमधील कट्ट्यांचे वाटप करण्यात येईल, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले. मात्र, सहा महिने झाले तरी फळविक्रेत्यांचे स्थलांतर न झाल्याने नवीन बांधण्यात आलेल्या मार्केटचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राजवाड्याला लागूनच अत्याधुनिक प्रतापसिंह महाराज भाजी मंडई उभारण्यात आली आहे. या भाजी मंडईमध्ये सध्या २६ हून अधिक भाजीविक्रेत्यांसाठी कट्टे आहेत. प्रत्येक भाजी विक्रेत्याला कट्ट्याचे वाटपही करण्यात आले आहे. आता भाजी विक्रेत्यांचा प्रश्न मिटला आहे; परंतु याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर फळविक्रेत्यांसाठी सुसज्ज असे कट्टे उभारण्यात आले आहेत. एकाच ठिकाणी लोकांना खरेदी करता यावी, हा हेतू ठेवून पालिकेने या मार्केटची उभारणी केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून राजवाड्याच्या भिंतीला लागून फळविक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. तसेच रस्त्याच्या आजूबाजूलाही काही फळविक्रेते बसत असतात. अशा व्यावसायिकांसाठी प्रतापसिंह भाजी मार्केटमध्ये कट्टे तयार करण्यात आले आहेत. परंतु पालिकेने या ठिकाणी या फळविक्रेत्यांचे अद्याप स्थलांतर केले नाही. त्यामुळे फळविक्रेते राजवाड्यालगत ठाण मांडून बसले आहेत. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर फळविक्रेत्यांना रस्त्यावरून उठविले जाईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले. मात्र, निवडणूक होऊन बरेच दिवस झाले तरी अद्यापही फळविक्रेत्यांनी मंडईमध्ये बसण्याची मानसिक तयारी केलेली दिसत नाही. किंवा पालिकेकडूनही तसे प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे एकाला न्याय वेगळा आणि दुसऱ्याला वेगळा का? असे भाजीविक्रेत्यांमधून बोलले जात आहे. राजवाड्यासारख्या मोक्याच्या ठिकाणी नेहमी नागरिकांची वर्दळ असते. फळविक्रेत्यांचा चांगला व्यवसाय होत असतो. त्यामुळे या ठिकाणाहून फळविक्रेते उठण्यास राजी नाहीत, असे बोलले जात आहे. (प्र्रतिनिधी)
फळविक्रेत्यांना हवंय मोक्याचं ठिकाण !
By admin | Published: June 14, 2015 11:50 PM