लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा किती होणार, याबाबत कोणतीही निश्चितता नसल्याने ऑक्सिजन मिळेल की नाही, याची खात्री देता येत नाही. यामुळे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता असलेल्या रुग्णांना आपल्या रुग्णालयात दाखल करून घेण्यास डॉक्टर नकार देत आहेत. जिल्ह्यात सर्वत्र तशी स्थिती असून, आता व्हेंटिलेटरसोबतच ऑक्सिजनचे ही बेड मिळणे अवघड झाले आहे.
सातारा जिल्ह्यात दररोज दोन ते अडीच हजार रुग्ण आढळून येत आहेत. यातील बरेच रुग्ण हे होमक्वारंटाईन होत असले तरीदेखील त्यांना योग्य प्रकारे औषधांचा पुरवठा आणि चाचण्या केल्या जात नाहीत. रुग्णही याबाबत टाळाटाळ करत असतात. त्यामुळे कोरोनाची मोठ्या प्रमाणावर लागण झाल्यावर श्वास घेण्यास अडचण होणे, धाप लागणे, यामुळे शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. या रुग्णांचा एचआरसीटी स्कोरही वाढलेला असतो. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कधी ऑक्सिजनची तर कधी व्हेंटिलेटरची आवश्यकता असते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून ऑक्सिजन किती मिळणार, उद्या ऑक्सिजन मिळणार की नाही, याबाबत कोणतीच खात्री रुग्णालयाला नसते. रुग्णांवर उपचार करायचे, त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा करायची की, ऑक्सिजन, रेमडेसिविर यासाठी धावपळ करायची, असा प्रश्न आता डॉक्टरांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे, असे रुग्ण दाखल करून त्यांना ऑक्सिजन न मिळाल्यास तडफडून मृत्यू होण्याऐवजी असे रुग्ण न घेणे, अधिक चांगले, अशी डॉक्टरांची मानसिकता तयार झाली आहे. त्यामुळे शहरातील अनेक दवाखान्यांमध्ये एचआरसीटी स्कोर जास्त असलेले आणि ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. त्यांना थेट जम्बो केअर सेंटरमध्ये जाण्यास सांगितले जाते. मात्र, या ठिकाणीदेखील मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने अनेक रुग्णांना बेड मिळविण्यासाठी ताटकळत राहावे लागते.
एकाच रुग्णालयात भरती होत असल्यामुळे रुग्णांनी देखील आपल्याला प्राथमिक स्वरूपात काही लक्षणे दिसताच होमक्वारंटाईन होऊन योग्य औषधे घेणे आवश्यक आहे. सरकारी रुग्णालयेदेखील नियमित वाढणाऱ्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे बेजार झाली आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये जसे मनुष्यबळ कमी आहे, तशीच परिस्थिती सरकारी रुग्णालयांमध्येदेखील निर्माण झालेली आहे. यामुळे आता रुग्ण घेणे बंद करणे, अशा प्रकारचा पर्याय डॉक्टरांनी स्वीकारला असला तरी तो अधिक धोकादायक असाच आहे.
यावर उपाय म्हणजेच जिल्हा प्रशासनाने रुग्णालयांची ऑक्सिजनची गरज ओळखून त्यानुसार त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करणे आवश्यक आहे. अगदी ऑक्सिजनचे सिलिंडर संपत आल्यानंतर होणारी धावपळ ही सर्वांसाठीच अडचणीचा विषय ठरू शकते. त्यामुळे आवश्यक तेवढा ऑक्सिजन उपलब्ध करून देणे, यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे.
कोट
रुग्णालयांच्या मागणीनुसार आम्ही ऑक्सिजन पुरवठा करत असतो. प्रत्येकाची मागणी कमी - जास्त स्वरूपात असू शकते. मात्र, कोणत्याही रुग्णालयाला ऑक्सिजन कमी पडणार नाही, याची खबरदारी प्रशासकीय पातळीवर घेण्यात येत असते. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये किंवा रुग्ण रुग्णालयात दाखल करून घेण्यास टाळाटाळ करू नये.
रामचंद्र शिंदे, प्रभारी जिल्हाधिकारी, सातारा
कोट
ऑक्सिजन मिळविण्यासाठी खूप धावपळ करावी लागत आहे. अशावेळी जर ऑक्सिजन उपलब्ध झाला नाही तर व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर असलेल्यांना जीव गमवावा लागेल. एका बाजूला नातेवाईकांचा राग सहन करणे आणि दुसऱ्या बाजुला प्रशासकीय पातळीवर अडचणींना सामोरे जाणे आणि त्यातून मार्ग काढत रुग्णांची प्रकृती सुधारणा, यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. रुग्णांना ऑक्सिजनशिवायही ठेवू शकत नाही. अशावेळी कोणताच पर्याय आमच्यासमोर असत नाही.
डॉ, प्रकाश इगावे - विघ्नहर्ता मल्टिस्पेशालिटी, हॉस्पिटल