फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या फलटण येथील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर व कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चरच्या वसतिगृहामध्ये राहणाऱ्या काही विद्यार्थिनींना अचानकपणे उलट्या, जुलाब व डोकेदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या सर्व विद्यार्थिनींची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर व कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चरच्या वसतिगृहामध्ये सुमारे दोनशे विद्यार्थिनी राहतात. दि.३१ डिसेंबर रोजी रात्री जेवण करून झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास काही मुलींना उलट्या, जुलाब व डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच दि.२ जानेवारी रोजी आणखीन काही मुलींना असाच त्रास जाणवू लागल्याने, त्यांनाही याच रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणण्यात आले.हा प्रकार समजतात मुलींच्या काही पालकांनी दवाखान्यामध्ये धाव घेतली. हा प्रकार फूड पॉयझनिंगचा असून पाण्यामुळे हा प्रकार झाला असावा असे या मुलींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. या रुग्णालयात किमान २० मुलींवर उपचार चालू असून त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर व धोक्याच्या बाहेर असून त्यांना वसतिगृहामध्ये अथवा त्यांच्या घरी पाठविण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे. याबाबत मुलींच्या सर्व आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्याबरोबरच वसतिगृहामधील पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
फलटणमध्ये वसतिगृहातील मुलींना विषबाधा, अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 3:49 PM