पाचगणी : निवासासाठी असणारी इमारत व्यवसायासाठी वापरणाऱ्या पाचगणी येथील हॉटेल द फर्नला जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सील ठोकल्याच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका चांदणी रियाल्टी यांनी पाचगणी नगरपालिके विरोधात दाखल केली होती. ही याचिका उच्च नायायलायाने फेटाळून हॉटेल फर्नला दहा लाखाचा दंड ठोठावला आहे. या निकालामुळे इतर अशा इमारती वापरकर्ते याची गंभीर दखल घेतील असा विश्वास पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.मुख्याधिकारी निखिल जाधव म्हणाले, पाचगणी येथे बांधलेली इमारत ही रहिवासासाठी असताना तिचा बिनदिक्कतपणे व्यवसायासाठी वापर केल्याचे निदर्शनास आल्याने पाचगणी नगरपालिकेने ही इमारत मे महिन्यात कडेकोट बंदोबस्तात सील केली होती. या मिळकतीचे सीलबंद केलेल्या कारवाईबाबत चांदणी रियाल्टी यांनी पाचगणी नगरपालिकेविरोधात न्यायालयात दाद मागितली होती.ही याचिका फेटाळताना मुख्य इमारतीच्या टेरेसवरील विनापरवाना शेड तीन महिन्यांचे आत त्यांनी स्वतः स्वखर्चाने काढून घ्यावे. आणि इमारतीचा वापर मंजूर नकाशात दाखवल्याप्रमाणे स्लोपिंग रूफ करावे. फक्त मुख्य इमारतीचे सील काढण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. तर मागील बाजूला असणारी मिळकतीचे सीलबंद कायम राहणार आहे. परंतु मुख्य इमारतीचे सील काढताना इमारत वापर हा फक्त रहिवासासाठीच करणे बंधनकारक राहील. इमारतीची उंची ३० फूट मर्यादेत असेल.दरम्यान, याचिकाकर्त्याने ब्रेड अँड बटरचे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे दोन रूमचे लायसन्स काढून तब्बल ७० रूमच्या माध्यमातून व्यावसायिक वापर केला. यामुळे उच्च न्यायालयाने दहा लाख रुपयांचा निधी कीर्तीकर लॉ लायब्ररीसाठी दोन आठवड्यात जमा करावेत. असे आदेश पारित करण्यात आल्याचे मुख्याधिकारी जाधव यांनी सांगितले.
Satara: पाचगणीतील हाॅटेल फर्नला उच्च न्यायालयाने ठोठावला दहा लाखांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 11:47 AM