सातारा : हवा पालटासाठी महाबळेश्वरला मुक्कामी आलेले उद्धव ठाकरे कुटुंबीय शेजारच्या हॉटेलमधील वरातीच्या नाचगाण्यामुळं अस्वस्थ झाले. त्याचा राग महाबळेश्वरमधील सर्वात मोठ्या ‘हॉटेल कीज’वर काढण्याचं परमकर्तव्य शिवसेनेच्या मंत्र्यांनी तत्परतेनं केलं. विशेष म्हणजे, या हॉटेलमध्ये नाचणारी विदर्भातील व-हाडी मंडळी मुख्यमंत्र्यांच्या जवळची निघाल्यानं साता-याच्या प्रशासनाची भलतीच गोची झालीय.
पंधरा दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे अन् त्यांचं कुटुंबीय महाबळेश्वरमध्ये दाखल झालं होतं. त्यांचे परम मित्र अन् उद्योजक अविनाश भोसले यांचा बंगला त्यांच्या स्वागतासाठी नेहमीप्रमाणं आतूरच होता. याच काळात शेजारील ‘हॉटेल कीज’मध्ये विदर्भातील एका भाजप आमदाराच्या पुतण्याचा विवाह सोहळा सुरू होता. सायंकाळी वरात निघाल्यानंतर या मंडळींनी डीजे लावून नाचण्यास सुरुवात केली. तेव्हा अस्वस्थ झालेल्याठाकरे कुटुंबीयाकडून हा आवाज बंद करण्याचं फर्मान निघालं.
मुंबईहून पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या कार्यालयातून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांना आदेश गेले. या अधिका-यांनी हॉटेल व्यवस्थापनाला सूचना केली. मात्र, उत्साही व-हाडी मंडळी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. मुंबईतील ‘सरकार’चा आदेश धुडकावून विदर्भातील व-हाडी मंडळींची वरात मोठ्या थाटात सुरूच राहिली.
त्यानंतर पोलिस खात्यालाही आदेश गेले; परंतु त्याचवेळी ‘रात्री दहाच्या आत कशी काय कारवाई करणार?’ असा सवाल खुद्द मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून विचारला गेल्यानं पोलिस अधिकारी गप्पच बसले. दोन मोठ्या खात्यांच्या शीतयुद्धात पोलिसांची गोची झाली. मात्र, दबाव प्रचंड वाढल्यानंतर या व-हाडी मंडळींवर ध्वनीप्रदूषणाची कारवाई करण्यात आली.
काही दिवसांनी ठाकरे कुटुंबीय मुंबईत परतल्यानंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या कार्यालयातून सूत्रं हलली. विधानसभेच्या अधिवेशनात महाबळेश्वरमधील ‘भल्यामोठ्या’ ध्वनीप्रदूषणावर गंभीरपणे चर्चा करण्यात आली. प्रदूषण मंडळाच्या अधिका-यांनी या हॉटेलवरच थेट कारवाई केली. जवळपास अलिशान ८४ खोल्या असलेल्या सर्वात मोठ्या हॉटेलला सील ठोकलं गेलं.
महाबळेश्वर नगरपालिकेलाही रामदास कदम यांच्या कार्यालयातून फर्मान सुटलं. त्यानुसार नगरपालिकेनं या हॉटेलचं नळ कनेक्शन तोडलं. विद्युत पुरवठा तोडण्यासाठीही अधिकारी युद्धपातळीवर कामाला लागले. या सर्व प्रकारामुळं ख्रिसमस सुटीच्या ऐन हंगामात हे हॉटेल बंद झालं आणि अनेक उच्चभ्रू पर्यटकांना बाहेर पडावं लागलं.एकेकाळी महाबळेश्वरचे नगराध्यक्ष राहिलेल्या डी़ एम़ बावळेकर या शिवसेना नेत्यालाही हॉटेलमधील बांधकाम बेकायदा असल्याचा साक्षात्कार झाला. आता हे बांधकाम पाडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत़