फलटण : शहरातील एका तरुण हॉटेल व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याचे अपहरण करुन निर्जन ठिकाणी घेऊन जात मारहाण करुन ४ लाख रुपये खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणा-या टोळीतील एका महिलेसह सात जणांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली.याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी संशयित उमेश संजय खोमणे (वय २८ वर्ष, रा. खराडेवाडी, ता.फलटण), गणेश बाळु मदने (१९ वर्ष, रा. पाचसर्कल, खामगाव), कुमार उर्फ बोक्या लक्ष्मण शिंदे (२७, रा. भाडळी खुर्द), जयराज उर्फ स्वागत आनंदराव (२६, रा. झिरपवाडी), आकाश काशिनाथ डांगे (३०, रा. भाडळी बु. ता फलटण), माया (टोपण नाव) व अनिल गजरे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सजल विलास दोशी (वय ३७, रविवारपेठ फलटण) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार, मागील चार महिन्यापासून त्यांच्या हॉटेलमध्ये एक महिला अधून मधून जेवणाचे पार्सल नेण्यासाठी येत होती. सदर महिलेचा मोबाईल क्रमांक त्यांच्याकडे होता. तिचे नाव 'माया' असे ती सांगत होते. एवढीच माहिती त्यांच्याकडे होती. सदर महिला व त्यांची ओळख झाल्यानंतर दिनांक ३० रोजी तरुण हॉटेल व्यवसायिका सोबत ती फिरायला जाण्यासाठी तयार झाली.सदर महिलेला सुरवडी या ठिकाणावरून त्यांच्या मोटरसायकलवर घेतले. लोणंद, वीरधरण या ठिकाणाहून फिरुन येत असताना काळज-बडेखान जवळ दोन इसमानी त्यांना अडवून "आमच्या बहिणीला घेऊन कुठे घेऊन फिरता" असे म्हणून मारहाण केली. यावेळी सदर महिला त्या ठिकाणावरून निघून गेली. त्यानंतर दोशी यांना संशयित इसम त्याच्यावर बलात्काराची केस दाखल करणार आहेत अशी धमकी देत होते. बळजबरीने फोन पे द्वारे २६ हजार रुपये घेतले आणि आणखी ४ लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. नाही तर नग्न फोटो व बलात्कार केल्याबाबत वदवुन घेतलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.पोलिसांनी गोपनीय माहिती काढून सदर महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले. फलटण शहरांमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार तिच्यासोबतच्या कटात सामील असल्याचे तपासात निष्पन्न झाले. संशयित सदर महिलेच्या मदतीने फिर्यादी दोशी यांना लुटत होते. या टोळीने फलटण, लोणंद भागात अनेकांना यापूर्वी हनीट्रॅपमध्ये अडकवलेले असण्याची शक्यता आहे. अशा लोकांनी आपल्या संबंधित पोलीस ठाण्याशी किंवा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.
Satara: फलटणमध्ये हनीट्रॅपचा 'माया'जाल, हॉटेल व्यवसायिकाला लुटले; महिलेसह सात जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 3:48 PM