नितीन काळेल।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सकाळी बिबट्यानं या गावातील जनावरांवर हल्ला केला, तर सायंकाळी तो तिथल्या घरासमोरून गेला. रात्री तर लांडगा, तरस, वस्तीवर आला होता. अशा प्रकारे कोठे ना कोठे वन्यप्राण्यांबद्दल चर्चा सुरू असतात. याला कारण म्हणजे जंगलातील खाद्य कमी होणे व लोकांच्या अतिक्रमणामुळेच हे प्राणी खाद्यासाठी मानवी वस्तीत येत आहेत. दोन-तीन दशकांपासून बिबट्याचं वास्तव्य अधिक करून उसातच असून, त्यांच्या स्थलांतराच्या वाटाही रोखल्या आहेत. त्यामुळेच भरकटून हे शिकारी प्राणी मानवी वस्तीत येत आहेत.जंगलात अनेक प्राणी हे मांसाहारी असतात. जंगलातीलच प्राण्यांची शिकार करून ते खातात. तर काही वन्यप्राणी शाकाहारी म्हणजेच तृणधान्य खाणारे असतात. मांसाहारी प्राणी जंगलातीलच हरण, ससे, चितळसारख्या प्राण्यांवर हल्ला करून पोटाची भूक भागवतात; पण अलीकडील काही वर्षांत जंगलातील शिकार करणारे प्राणी मानवी वस्तीत दिसू लागले आहेत. लोकवस्तीत येऊन कुत्र्याची शिकार करणे, पाळीव प्राण्यांना भक्ष्य करणे असे प्रकार होत आहेत. विशेषत: करून बिबट्याचा वावर मानवी वस्तीत अधिक आहे.कºहाड, पाटणसारख्या तालुक्यांत बिबट्या वारंवार दिसतो. तसेच त्याच्याकडून गावाशेजारी येऊन घरात घुसणे, कुत्री, पाळीव प्राण्यावर हल्ला करणे असे प्रकार होतात. तर सातारा शहराच्या आसपासच्या उपनगरातही वारंवार बिबट्या दिसून आला आहे. पिंजरा लावूनही तो त्याकडे फिरकला नाही. बिबट्या हा जंगलातील प्राणी असलातरी गेल्या दोन-तीन दशकांत तो उसातच वाढला आहे. त्याच्या दोन-तीन पिढ्या उसातच जन्माला आल्या. त्यातच जिल्ह्याच्या पश्चिम भागात उसाचे क्षेत्र अधिक आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने जंगलात राहिला. त्यामुळे त्याला जंगल हे आपला अधिवास आहे, असे वाटत नाही. त्यामुळेच तो उसातून बाहेर येऊन मानवीवस्तीत खाद्यासाठी येत असतो.लांडगा, कोल्हा, तरस हे ही चोरटे शिकारी आहेत. तरससारखा प्राणी टाकून दिलेल्या मांसाच्या शोधात गावात येतो. लांडगा तर दिवसाही शेळ्या, मेंढ्यांची शिकार करतो. मानवी वस्तीत खाद्य अधिक असल्याने वन्यप्राणी मानवी वस्तीत येत आहेत. खाद्याची कमतरता व लोकांचे जंगलात अतिक्रमण हेच यामागील प्रमुख कारण आहे, हेच समोर येते.सहजासहजीमिळणारे भक्ष्य...बिबट्या हा अनुकूलनशील प्राणी आहे. त्याला विशिष्ट ठिकाणीच राहू वाटते, असे नाही. उसात राहतो तसेच त्याचे डोंगरकपारीतही वास्तव्य असते. त्याचबरोबर त्याला कुत्र्यासारखा प्राणी खाद्य म्हणून आवडतो. असे भक्ष्य मानवी वस्तीत सहजासहजी मिळते. म्हणून तो गाव, शहराजवळ अधिक करून येत असावा, असा अंदाज आहे.पर्यटन, लाकूडतोड, शेतीही कारणीभूत...वनक्षेत्रात विविध कारणांनी लोकांची घुसखोरी वाढली आहे. खणकाम, पर्यटन, बांधकाम, शेती, लाकूडतोड अशी कारणे यामागे आहेत. परिणामी जंगलातील प्राण्यांना हा धोका वाटू लागला. तसेच जंगलक्षेत्र विरळ झाले, गवताळ भाग कमी झाला, यामुळे तृणभक्षी जनावरे कमी झाली. यामुळे शिकार करणाऱ्या प्राण्याला खाद्य कमी झाले. त्यामुळे तो भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत येत आहे.बिबट्यांची संख्या जिल्ह्यात अधिकराज्यात जुन्नरनंतर सातारा जिल्ह्यात बिबट्याची संख्या अधिक आहे. जिल्ह्यात उसाचे प्रमाण अधिक असल्याने लपण्यास जागा आहे. हे एक संख्या वाढण्याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बिबट्याचा संचार दिसून येतो.
बिबट्याचं घर दोन दशकांपासून उसातच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:11 AM