महाबळेश्वर : महाराष्ट्राची चेरापुंजी.. थंड हवेचे ठिकाण अन् पावसाचे माहेरघर म्हणजे महाबळेश्वर. येथे गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. पावसाची उघडझाप आणि धुक्याचा खेळ याचा आनंद पर्यटक घेत आहेत. महाबळेश्वरमध्ये रविवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू होताच संरक्षणासाठी स्थानिकांकडून घरांना प्लास्टिक व झड्या लावण्याचे काम सुरू केले होते. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
महाबळेश्वमध्ये दिवसाला ४८२ मिलिमीटर अर्थात १९ इंचांपर्यंत पाऊस पडतो. जून, जुलै, आॅगस्ट या महिन्यांमध्ये तर महाबळेश्वरमध्ये सूर्याचं दर्शनच होत नाही. आता या नगरीचे स्वरूप हंगामी राहिले नसून बारमाही झाले आहे. येथे येणारे पर्यटक आता पावसाळ्यामध्ये देखील निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी येतात.
येथील हॉटेल व्यावसायिक हंगाम संपताच जून महिन्यामध्ये पावसाळी नियोजनास सुरुवात करतात. ते प्रथम झड्या व प्लास्टिक, शेगडीसाठी, कपडे सुखविण्यासाठी लागणारा कोळसा आदींची खरेदी स्थानिक करतात. कारण तीन-चार महिने धुवाँधार कोसळणाऱ्या पावसापासून घरांचे, इमारतींचे संरक्षण व्हावे, या दृष्टीने घराच्या छतावर प्लास्टिक कागद तसेच संपूर्ण इमारती प्लास्टिकने बंद करण्याची कामे वेगाने सुरू असतात.
आर्द्रता, थंडी व पावसाळी विषाणू येण्यापासून प्रतिबंध करणे हा एकमेव झड्या लावण्याचा उद्देश असतो. पूर्वीपासून गवत व कारवीच्या काड्यांनी झड्या लावल्या जात होत्या. आधुनिकतेकडे जाताना बाजारात गवताच्या झड्यांना आता विविध रंगी प्लास्टिक कागदाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. विविध रंग व आकाराचे प्लास्टिक कागद बाजारात उपलब्ध आहेत. या कागदाने संपूर्ण इमारत सहजपणे आच्छादू जाऊ लागल्याने प्लास्टिक कागदांच्या वापरात वाढ झाली आहे.इमारतीच्या छतांसाठी प्लास्टिक कागदाचा वापर वाढला आहे. प्लास्टिक कागदासोबतच पारंपरिक झड्यांचा वापर आजही सुरूच आहे.पावसाळ्यात नौकाविहार बंद..महाबळेश्वर व पाचगणीची जीवनवाहिनी असलेल्या व पर्यटकांच्या पसंतीचे नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णा लेक पावसाळ्यामध्ये काहीच दिवसांत दुथडी भरून वाहते. त्यामुळे नगरपालिका नौकाविहार बंद ठेवते तर हे पाणी महाबळेश्वर, पाचगणी या मुख्य रस्त्यावर आल्याने अनेकवेळा वाहतूक ठप्पदेखील होते.