महाबळेश्वर : पाचगणी येथे घोड्यावरून पडून पर्यटकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर गेल्या तीन दिवसांपासून घोडे व्यवसाय बंद ठेवण्यात आला आहे. घोड्यावरून पडून कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी हेल्मेट, नीपॅडसह अत्यावश्यक गोष्टी व घोडे व्यावसायिकांची नोंदणी, रितसर परवाना देण्याचा अधिकार मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
पोलिसांनी घोडेव्यावसायिकांची बैठक घेत मार्गदर्शन करण्यात आले. या सर्व गोष्टींची पूर्तता केल्यानंतर येत्या दोन दिवसांत महाबळेश्वर येथील घोडे व्यवसाय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी दिली.गेल्या बुधवारी पाचगणी येथील प्रसिद्ध टेबललँडवर पर्यटनासाठी आलेल्या मुंबई येथील पर्यटकांचा घोड्यावरून पडून मृत्यू झाला होता. अरबी समुद्र्रातील बोट दुर्घटना व घोडे दुर्घटना या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर पोलीस अलर्ट झाले असून, वाई उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली.
या बैठकीत पालिका प्रशासन, घोडे व्यावसायिक आदींना पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याच्या पोलीस प्रशासनाच्या वतीने सूचना देण्यात आल्या आहेत.थंड हवेचे ठिकाण असलेल्या पर्यटकांचे महाबळेश्वर सध्या दिवाळी हंगामासाठी सज्ज झाले आहे. येथे येणाºया पर्यटकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी स्थानिक प्रशासन देखील सज्ज झाले आहे. या थंड हवेच्या पर्यटनस्थळी पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेत महाबळेश्वर पोलिसांनी त्यादृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या उपस्थितीत महाबळेश्वरमधील हॉटेल व्यावसायिक व्यापारी, नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेण्याच्या दृष्टीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महाबळेश्वरमध्ये पर्यटनास येणाºया पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यास पोलीस प्रशासनाने सुरुवात केली आहे. पालिकेचा वेण्णालेक नौकाविहार परिसराचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने लाईफ जॅकेट, सेफ्टी रिंग, नादुरुस्त बोटी आदींचा समावेश होता. पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यामध्ये काही गोष्टींचा अंतर्भाव जाणविल्याने वेण्णालेक नौकाविहार काहीकाळ सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आला होता.
महाबळेश्वरचे वैभव असलेला व पर्यटकांच्या मुख्य आकर्षणाचे ठिकाण असलेले पालिकेचे वेण्णालेक येथे नौकाविहारास जाणाºया प्रत्येक पर्यटकास लाईफ जॅकेट, स्पीडबोटसह जीवरक्षक ठेवण्यात यावेत, अशा सक्त सूचना पालिका प्रशासनास देण्यात आल्या आहेत. एकंदरीत प्रशासनाकडून पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी प्रयत्न सुरू झालेत.लाखोंची उलाढाल थांबली..महाबळेश्वरमध्ये वेण्णा लेक येथे घोडेव्यावसाय अतिशय जोमात सुरू असतो. परंतु पाचगणी येथे घोड्यावरून पडून एका पर्यटकाचा मृत्यू झाल्यानंतर या व्यवसायाला गालबोट लागले. तसेच जिल्हा प्रशासनही खडबडून जागे झाले. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे, अशी मागणी होऊ लागल्यानंतर प्रशासनाने तत्काळ महाबळेश्वरमध्ये बैठक आयोजित केली. या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तीन दिवसांपासून हा व्यवसाय बंद असल्याने लाखोची उलाढाल थांबली आहे.