औंध : खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील पोलीस दूरक्षेत्रातील पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत विष्णूपंत देव (वय ५५) याला सोमवारी सायंकाळी सहा वाजता पोलीस दूरक्षेत्र कार्यालयातच पंधरा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे पुसेसावळीसह औंध परिसरात खळबळ उडाली आहे.याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘तक्रारदाराची म्हैस चोरीला गेली होती. याप्रकरणी औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील चोरीस गेलेली म्हैस परत मिळवून दिल्याबद्दल १५ हजार रुपयांची मागणी उपनिरीक्षक देव यांनी केली होती. लगेचच तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांच्याकडे याबाबत अर्ज दिला होता. तक्रारदार व उपनिरीक्षक देव यांच्यात झालेल्या तडजोडीअंती १५ हजार देण्याचे ठरले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सकाळपासून पुसेसावळी येथे सापळा रचला होता.लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक अशोक शिर्के पोलीस नाईक संजय साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद राजे, विशाल खरात, संभाजी काटकर यांच्या पथकाने सायंकाळी सहा वाजता पुसेसावळी दूरपरिक्षेत्र कार्यालयातच लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. पुसेसावळी येथे दोन महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या पुसेसावळीचे पोलीस उपनिरीक्षक दोनच महिन्यांतच त्यांच्यावर कारवाई झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दिवसभर चर्चा सुरू होती.निवृत्ती अडीच वर्षांवरपुणे जिल्ह्यातील वडगाव निंबळक येथून पुसेसावळी दूरपरिक्षेत्रात हजर झालेले देव अडीच वर्षांनी सेवानिवृत्त होणार होते. मात्र त्यापूर्वीच सोमवारी त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.सकाळपासून पाळत ठेवूनलाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी व कर्मचारी सोमवारी सकाळपासूनच देव यांच्यावर नजर ठेवून होते. ज्या दिवशी तक्रारदाराचा अर्ज त्यादिवशीच लाचलुचपत विभागाने कारवाई केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कौतुक होत आहे.
लाच घेताना हवालदार गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:31 AM