सांगली : राष्ट्रवादीचे मतदार कधीच आमिषाला बळी पडणार नाहीत. त्यामुळे कारमधून वाटप करा किंवा हेलिकॉप्टरमधून करा, राष्ट्रवादीची मते फिरणार नाहीत, असे मत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी बुधवारी राष्ट्रवादी कार्यालयातील बैठकीत व्यक्त केले. सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था गटातील विधानपरिषदेच्या निवडणुकीनिमित्त सांगलीत सदस्यांची बैठक पार पडली. यावेळी आ. जयंत पाटील, आ. शशिकांत पाटील, आ. सुमनताई पाटील, आ. प्रभाकर घार्गे आदी उपस्थित होते. नाईक-निंबाळकर म्हणाले की, वाटपावर मते फिरतील, असा अनेकांचा गैरसमज आहे. त्यांनी मतदारांना गाडीतून किंवा हेलिकॉप्टरमधून वाटप केले तरी राष्ट्रवादीला फरक पडणार नाही. राज्यातील कॉँग्रेसची संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न काही नेतेमंडळी करीत आहेत. राष्ट्रवादीचे संख्याबळ या मतदारसंघात अधिक आहे. पक्षाचे सदस्य कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे. जयंत पाटील म्हणाले की, आमचे सदस्य कॉँग्रेसविरोधात लढून निवडून आल्याने ते काँग्रेस नेत्यांकडे कधीच जाणार नाहीत. कार्यकर्त्यांना गृहीत धरण्याचा प्रकार काँग्रेसकडून होत आहे. सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळण्यात कोणतीही अडचण नाही. सदस्य राष्ट्रवादीच्या पाठीशी ठाम आहेत. आ. शिंदे म्हणाले की, कॉँग्रेसने आघाडीच्या चर्चेवेळी हटवादी भूमिका घेतली. वास्तविक एका व्यक्तीच्या अहंपणामुळेच आघाडी होऊ शकली नाही. पक्ष संपला तरी चालेल, पण मित्रपक्षाला सहजासहजी काही मिळू द्यायचे नाही, अशा भावनेतून काँग्रेसचे हे लोक काम करीत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अशा नेत्यांची जागा राष्ट्रवादीचे मतदार दाखवून देतील. एकूण सहा विधानपरिषदेच्या जागांपैकी हक्काच्या पाच जागा राष्ट्रवादीच्या असताना कॉँग्रेसच्या नेत्यांनी तीन जागांसाठी हट्ट धरला. त्यामुळेच आघाडी झाली नाही. जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी आमदार मानसिंगराव नाईक, दिनकर चव्हाण, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, ताजुद्दीन तांबोळी, राहुल पवार, सागर घोडके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) पाहुणचार : कोणाचाही घ्या... शशिकांत शिंदे म्हणाले की, मतदारांनी पाहुणचार कोणाचाही घ्यावा, मात्र पाहुणचार देताना शेखर गोरेंना द्यावा. जयंत पाटील यांनी ठरविले तर ते कोणाचाही ‘कार्यक्रम’ करू शकतात. त्यांनी तो करावा, पण त्यांनीही पाहुणचार गोरे यांच्याकडून घ्यावा. जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत धनशक्तीविरोधात लढा असल्याचे मत मांडले. कोणी कितीजणांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला, तरी राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून येणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कसेही वाटप करा, मते फिरणार नाहीत
By admin | Published: November 02, 2016 11:34 PM