दीपक शिंदेसातारा : फलटणसारख्या ठिकाणाहून मुंबई महानगरीत जाणे आणि आपला जम बसविणे तसे सोपे नाही. पण, नंदकुमार ननावरे यांनी ही किमया करून दाखविली होती. ती देखील त्या काळातील गुन्हेगारीमध्ये अव्वल असलेल्या पप्पू कलानी यांचा विश्वास संपादन करून. पप्पू कलानी हे उल्हासनगर भागात तीनवेळा निवडून आले. त्यातील दोनवेळा ते तुरुंगात असताना निवडून आले. त्यांचे सर्व काम हे नंदकुमार ननावरे पाहत होते. त्यानंतर ज्योती कलानी दोनवेळा आमदार झाल्या. त्यांचीही कामे नंदकुमार ननावरे हेच पाहत होते. मग, असे काय झाले ? ननावरे यांची कोणती गुपिते बाहेर पडली ज्यामुळे त्यांचे जगणे अवघड झाले. याचाही आता पोलिस शोध घेऊ लागले आहेत.जिल्ह्यातील अनेक लोक रोजगाराच्या निमित्ताने मुंबईकडे जात असतात. अशाच पद्धतीने नंदकुमार ननावरे हे १९९३ साली नोकरीच्या निमित्ताने मुंबईला गेले. उल्हासनगर भागात ते राहात होते. त्याच ठिकाणी आमदार असलेल्या पप्पू कलानी यांच्याशी त्यांची जवळीक वाढत गेली. कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्यांनी याठिकाणी काम करणे सुरू केले. गुन्हेगारी जगतात रुबाब असलेल्या पप्पू कलानी यांची अनेक कामे त्याकाळात प्रामाणिकपणे करत होते. त्या काळातील सर्व बड्या लोकांशी त्यांचा संपर्क होता. त्यांनीही स्वीय सहाय्यकाचा रुबाब अनुभवला होता. पप्पू कलानी यांची मंत्रालयातील अनेक कामे हे ननावरे करत असत.
त्याबरोबरच गुन्हेगारी जगताशी संबंधित असलेल्या अनेक घडामोडी त्यांना माहीत होत्या. त्यातून मार्ग काढणे आणि न्यायालयीन कामकाजातही वकिलांना मदत करण्याचे काम त्यांच्याकडे होते. अनेक वकिलांच्या मदतीने त्यांनी कलानींशी संबंधित असलेल्या अनेक लोकांना खटल्यातून सहीसलामत बाहेरही काढले होते. त्यामुळे त्यांच्यावर अनेकांचा विश्वास वाढला आणि ननावरे यांचेही प्रस्थ वाढत गेले. ज्योती कलानींच्या काळात तर सर्व काम ननावरेच पाहत होते. चहापेक्षा किटली गरमअलीकडे मंत्र्यांपेक्षा स्वीय सहायकांचा रुबाब अधिक वाढलेला पाहायला मिळतो. मंत्र्यांची वेळ मिळेल पण स्वीय सहायकांची वेळ मिळणे अवघड. त्यांच्याशिवाय पुढे जाताच येत नाही. अशीच परिस्थिती ननावरे यांची असल्यामुळे काहींनी नंदीला नमस्कार करूनच परतावे लागत होते. हीच बाब अनेकांना खटकत होती. त्यामुळे त्या काळापासून ननावरे यांचा प्रभाव कमी करण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न सुरू होता. अखेर ती वेळ आलीच.
ननावरे..मंत्रालयातील लायझनरपप्पू कलानी यांची छोटी-मोठी सर्व कामे ननावरे पाहत असताना त्यांना त्या कामांचा अंदाज आला होता. त्या जोरावर त्यांनी इतरांचीही कामे घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे लायझनर म्हणून त्यांची ओळख झाली. अधिकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण करून त्यांच्याकडून कामे करून घेण्याचे कसब त्यांनी अनेक वर्षांच्या अनुभवावरून मिळविले होते. त्यामुळे इतर काही मंत्री आणि आमदारांची कामेही त्यांच्याकडे येत होती.
ढवळ्या शेजारी...पवळ्या बांधलागुन्हेगारी जगतातील लोकांना अडकलेल्या दलदलीतून बाहेर काढताना कधी कधी आपल्याही हाताला माती लागते. तशीच अवस्था ननावरे यांची झाली. अनेकांना बाहेर काढताना थोडी माती त्यांच्याही पायाला लागली. त्यांची दोन लग्ने झाली होती. आत्महत्या केलेली त्यांची पहिली पत्नी उज्ज्वला या होत्या. दोन्ही पत्नींसह ते एकाच घरात राहत होते. त्याबरोबरच उल्हासनगर आणि जवळपासच्या अनेक बड्यांची व्यवस्था करून देण्याचेही काम त्यांच्यावर सोपविण्यात आले होते. ते देखील ते पार पाडत होते.
तोडलेले बोट अजूनही फलटणमध्येच..नंदकुमार ननावरे आत्महत्येचा योग्य तपास होत नाही असे दिसल्यावर त्यांचे बंधू धनंजय ननावरे यांनी आपल्या हाताचे बोट तोडून घेतले. ते देवेंद्र फडणवीस यांना देणार होते. पण, अजूनही ते फलटणमध्येच आहे. सुरुवातीला त्यांना उपचारासाठी फलटणमध्येच दाखल करण्यात आले होते. पण, फलटणमधील एका नेत्याच्या सांगण्यावरून त्यांना पुण्याला पाठविण्यात आले. याठिकाणी बोट जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, रुग्णालयाने ते शक्य नसल्याचे सांगितल्याने तोडलेल्या बोटासह धनंजय ननावरे यांना फलटणलाच परतावे लागले.