सातारा : ‘छत्रपती शिवाजी महाराज कायमच अन्यायाच्या विरोधात लढले. त्यांच्या घराण्यात मी जन्माला आलो असे विचारणारे तुम्ही कोण? टोलनाके चालविणाऱ्यांनी उगाच आम्हाला शहाणपण शिकवू नये,’ असा सणसणीत टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना लगावला.साताऱ्यात एका कार्यक्रमावेळी खा. उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजेंवर जोरदार टीका केली होती. वेळ, वार, ठिकाण ठरवून समोरासमोर या असे आव्हान खासदारांनी दिले होते. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सोमवारी दुपारी ‘सुरुची’ या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन खासदारांच्या या आव्हानाचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, ‘खा. उदयनराजे यांनी अजिंक्य उद्योग समूहाबद्दल भ्रष्टाचाराचे तुणतुणे वाजविणे बंद करावे. अजिंक्य उद्योग समूहाची वार्षिक उलाढाल साडेतीनशे कोटी रुपयांची आहे. या माध्यमातून हजारो युवकांना रोजगार मिळाला असून, अनेकांचे संसार उभे राहिले आहेत. अशी एखादी संस्था उदयनराजे यांनी उभी केली आहे काय?काही लोकांना मिशा काढीन, भुवया काढीन असे डायलॉग मारण्यापलीकडे काही काम उरलेले नाही. ते नेहमीच समोरासमोर या आणि होऊन जाऊ द्या, असं म्हणत असतात. पण समोरासमोर येऊन करायचे काय? जिल्हा बँक निवडणुकीच्या वेळी आपली राजकीय ताकद नव्हती तेव्हा आपण माझ्याच केबिनमध्ये बसला होतात. तेव्हा काय केले. टोलनाके चालवणारे राजघराण्यात कसे काय जन्माला आले? टोलनाक्यावर हाणामारी, दादागिरी, वसुली असले प्रकार कोणाच्या सांगण्यावरून घडत होते, हे संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. टोलनाके चालवणाऱ्या खासदारांनी आम्ही काय करावे आणि काय करू नये हे आम्हाला शिकवू नये.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले...
- पालिकेत अशोक मोने निवडून आले तर मी भुवया, मिशा काढीन असे ते म्हणाले होते. ते निवडूनही आले. पण उदयनराजेंना अजूनही भुवया, मिशा सापडल्या नाहीत
- स्वत:चं पेटिंग काढून जर साताऱ्यातील प्रश्न सुटणार असतील तर गल्लीबोळातही पेटिंग काढा
- उदयनराजेंसोबत बाजार समितीत कसलीही तडजोड करणार नाही
- सत्ताधारी सातारा विकास आघाडीने पाच वर्षांत सातारा पालिका धुवून खाल्ली
- पालिकेत सर्वसामान्य महिलेला खुर्चीवर बसविले. पण त्यांना काम करण्याची संधी दिलीत का?
- सातारा पालिका भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आम्ही तयारीला लागलो असून सातारकर लवकरच उदयनराजे आणि त्यांच्या आघाडीला नारळ देतील