चाफळ : चाफळ-दाढोली मार्गे व्हाया पाटण रस्ता महाबळवाडीजवळ दोन्ही बाजूंच्या साईडपट्ट्या वाहून गेल्याने धोकादायक बनला आहे. सध्या शालेय प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांना सतत पाटणला ये-जा करावी लागत आहे. यातच एसटी महामंडळास हा रस्ता वाहतुकीस योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिल्याशिवाय म्हणे बससेवा सुरू करता येणार नाही. याचा नाहक त्रास मात्र विद्यार्थ्यांसह पालकांना सहन करावा लागत आहे. बांधकाम विभागाने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
चाफळ-दाढोलीकडून पाटणला जोडणारा घाटरस्ता आहे. गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाबळवडीनजीक ठिकठिकाणी रस्ता खचला होता. पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहिल्याने साईडपट्ट्यांचीही मोठी दुरवस्था झाली आहे. दरम्यान, बांधकाम विभागाने रस्ता तात्पुरता वाहतुकीस योग्य बनविण्यासाठी आटापिटा केला. मात्र, ज्या ठेकेदारांकरवी हे काम केले गेले त्याने साईडपट्ट्या दुरुस्तच केल्या नाहीत. त्यामुळे एसटी बससारखे मोठे वाहन या रस्त्यावरून घेऊन जाताना वाहनचालकाला अपघाताला निमंत्रण देण्यासारखी परिस्थिती आहे. प्रवासी, विद्यार्थ्यांची या रस्त्यावरून वाहतूक करण्यास एसटी महामंडळाने नकार दिला आहे. बांधकाम विभाग या रस्त्यावरील साईडपट्ट्यासह रस्ता जोपर्यंत योग्य पद्धतीने दुरुस्त करत नाही व रस्ता वाहतुकीस योग्य आहे, असे पत्र देत नाही तोपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.
चाफळसह विभागातील दाढोली, कोचरेवाडी, महाबळवाडी, मसुगडेवाडी, डेरवण, वागजाईवाडी, भैरेवाडी, पाडळोशी या गावांतील चाकरमनी, तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी चाफळ, पाटण, उंब्रज, कऱ्हाड येथे जात असतात. सध्या शालेय प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांना सतत पाटण, कऱ्हाडला ये-जा करावी लागत आहे. मात्र, बस सुरू नसल्याने पालकांसह विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बांधकाम विभाग व एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बंद रस्ता व बसेस त्वरित सुरू कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विभागातील ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांनी दिला आहे.
कोट..
दाढोली-महाबळवाडी मार्गे पाटण रस्ता अतिवृष्टीमुळे नादुरुस्त आहे. रस्ता दुरुस्त करून वाहतुकीस योग्य असल्याचे प्रमाणपत्र आम्हाला दिले जात नाही, तोपर्यंत या मार्गावर बससेवा सुरू करता येणार नसल्याचे पाटणच्या आगारप्रमुखांनी सांगितल्याने बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करून पत्र द्यावे.
- प्रकाश पवार, माजी सरपंच, दाढोली.