सागर गुजर- सातारा-सातारा विधानसभा मतदारसंघात १९७८ पासून राजघराण्याच्या सत्तेला कुणीही शह देऊ शकलेले नाही. मात्र, काँगे्रस, भाजप व शिवसेना या प्रमुख पक्षांच्या अधिकृत उमेदवारांनी राजेंविरोधात वेळोवेळी रान पेटविले, हा इथला इतिहास आहे. राजघराण्यातील अंतर्गत संघर्षाला मनोमिलनानंतर पूर्णविराम मिळाला. यानंतर इथली सर्वच सत्तास्थाने मनोमिलनाच्या अधिपत्त्याखाली आली असली तरी विधानसभा निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्ष एकमेकांशी झुंजणार असल्याने राजेंच्या सत्तास्थानांचा कस लागणार आहे.सातारा-जावळी मतदारसंघात प्रतापगड, अजिंक्यतारा हे दोन कारखाने, ग्रामपंचायती, सोसायट्या, पंचायत समिती या सत्तास्थानांवर राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता आहे. मतदारसंघातील बहुतांश सत्तास्थाने ही पालकमंत्री शशिकांत शिंदे, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व मानणारी आहेत. जिल्हा परिषदेचा कुडाळ गट सोडला तर इतर ठिकाणी राष्ट्रवादीने पाळेमुळे भक्कम केली आहेत. कुडाळ गट दीपक पवारांच्या ताब्यात असला तरी याठिकाणी दिवंगत आमदार लालसिंगराव शिंदे, राजेंद्र शिंदे व त्यांच्यानंतर सुनेत्रा शिंदे यांचे नेतृत्व मानले जाते. या सर्वच सत्तास्थानांचा कस या निवडणुकीच्या निमित्ताने लागणार आहे. सातारा मतदारसंघात १९७८ मध्ये जनता पक्षातून निवडणूक लढविलेल्या दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांच्याविरोधात काँगे्रसने बाबूराव घोरपडे यांना उभे केले होते. १९८0 मध्ये बबनराव उथळेंशी संघर्ष करून अभयसिंहराजे निवडून आले होते. १९९८ च्या निवडणुकीत भाजपकडून उभे असलेल्या उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पराभव केला होता. त्यानंतर १९९९ च्या निवडणुकीत पुन्हा उदयनराजेंचा पराभव करून अभसिंहराजे निवडून आले होते. हा इतिहास पाहता काँगे्रस आणि भाजपने बळ लावल्यानंतर प्रस्थापितांना संघर्षातून जावे लागले, हे स्पष्ट होते. यंदाची निवडणूकही काहीशी २00४ पूर्वीच्या निवडणुकांची आठवण करून देणारी ठरली आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर २००९ मध्ये सातारा-जावळी हा नवा मतदारसंघ तयार झाला. त्यावेळी दोन्ही काँगे्रस एकत्र लढली. शिवेंद्रसिंहराजे या निवडणुकीत विजयी झाले. मात्र, त्यावेळी काँगे्रसशी असणाऱ्या आघाडीचा त्यांना लाभ झाला होता. काँगे्रस-राष्ट्रवादीचा जिल्हाभर असणारा संघर्ष सातारा-जावळीत फारसा पाहायला मिळत नव्हता. राजेंचे नेतृत्व मानून त्यांचे काम करण्याची नीती काँगे्रस नेत्यांनी कायम ठेवली. यंदा मात्र काँगे्रस त्यांच्यासोबत नाही. काँगे्रसचे महिला आघाडीचे अनेक वर्षे जिल्हाध्यक्षपद भुषविणाऱ्या रजनी पवार यांना काँगे्रसने संधी दिली असल्याने त्यांचा मोठा कस याठिकाणी लागणार आहे.१९९८ च्या पोटनिवडणुकीचा अपवाद वगळता भाजपला या मतदारसंघात फारसे यश मिळालेले नाही. दीपक पवार यांच्या निमित्ताने भाजपला एक राजकीय चेहरा मिळालेला आहे. तर शिवसेनेने लालबाग-परळमध्ये वर्चस्व असणाऱ्या माजी आमदार दगडू सकपाळ यांच्या हाती बाण देऊन त्यांना लढायला धाडले आहे. सकपाळ हे मूळचे जावळी तालुक्यातील आहेत. अहिरे वानवली तर्फ सोळशी, हे ६० ते ७० घरांचं त्यांचं गाव. नोकरी व्यवसायानिमित्त जावळीतले लोक मुंबईत स्थायिक आहेत. त्यामुळेच दगडू सकपाळ यांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. हा प्रभाव मतांमध्ये रूपांतरित करण्यात सकपाळ यशस्वी होतीलही; परंतु साताऱ्याचे काय?, हा प्रश्न त्यांना सतावणार आहे. साताऱ्यात नगरपालिका, पंचायत समिती, तालुक्यातील स्थानिक ग्रामपंचायती, सोसायट्यांमध्ये मनोमिलनाची सत्ता आहे. ‘मनोमिलनाचा वारू’ हाच मुळात शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधकांसमोर आव्हान ठरणार आहे. नावपक्षशिवेंद्रसिंहराजे भोसले राष्ट्रवादीदगडू सकपाळ शिवसेनादीपक पवारभाजपरजनी पवारकाँग्रेसराहूल पवारमनसेसंदीप कांबळेअपक्षअभिजीत बिचुकलेअपक्षसागर भिसेअपक्षदिलीप जगतापअपक्ष
राजेंच्या बालेकिल्ल्यात अनेकांचा कस
By admin | Published: October 01, 2014 10:10 PM