सातारा : शहरात अलीकडे रोडरोमिओंचे कट्टे पाहायला मिळत असून, यामुळे घराबाहेर पडलेली मुलगी सायंकाळी घरी परतेपर्यंत पालकांच्या हृदयाचे ठोके वाढतायत. निर्भया पथक व शहरातील पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास शहरात फिरून हे रोडरोमिओंचे कट्टे उद्ध्वस्त करावेत, असे पालक मनापासून पोलिसांना आवाहन करतायत.
राज्यात इतर ठिकाणी मुलींवर अत्याचार आणि छेडछाडीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे साताऱ्यातील पालकवर्गही चिंतेत आहेत. इतर ठिकाणी जशा घटना घडल्या तशा प्रकारच्या घटना आपल्या सातारा शहरात घडल्या नाहीत. मात्र, अलीकडे रोडरोमिओंचे कट्टे पाहून उद्याची चिंता पालकांच्या चेहऱ्यावर दिसू लागली आहे. हीच चिंता ओळखून पोलिसांनी रोडरोमिओंचे अड्डे उद्ध्वस्त करावेत, इतकीच पालक मागणी करतायत.
चाैकट :
या ठिकाणी रोडरोमिओ पोलिसांना दिसत नाहीत का
बसस्थानक....
बसस्थानक तर रोडरोमिओंचा अड्डाच आहे, इथे तर रोज मुले सकाळ, संध्याकाळ बसस्थानकात किंवा बाहेरच्या कट्ट्यावर गप्पा मारत बसतात, यापूर्वी इथे वारंवार छेडछाडीचे प्रकार घडत होते. मात्र, आता हे प्रकार कमी झाले असले तरी रोडरोमिओंचे अड्डे मात्र, वाढले आहेत.
चाैकट :
राजवाडा...
राजवाडा परिसरामध्ये दोन ठिकाणी रोडरोमिओंचे अड्डे आहेत. पहिला अड्डा तुळजाभवनी काॅम्प्लेक्सच्या परिसरात तर दुसरा अड्डा नगर वाचनालयाशेजारी. इथं सुद्धा सायंकाळच्या सुमारास मुले घोळक्याने थांबलेली असतात.
देवी चाैक...
देवी चाैकातही सायंकाळी रोडरोमिओ उभे असलेले पाहायला मिळतात. कधी कन्या शाळेच्या पायरीवर तर कधी सीटी पोस्टाच्या पायरीवर युवक बसलेले असतात. इथे गेल्या महिन्यात एका मुलीची छेड काढण्यात आली होती. मात्र, मुलीच्या पालकांनी आणि घरातल्यांनी संबंधित मुलाला चांगलाच धडा शिकविला. त्यामुळे हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला नाही.
चाैकट : कोणी छेड काढत सेल तर येथे संपर्क करा
कोणी छेड काढत असेल तर नेमके काय करावे, हे मुलींना सुचत नाही. भीतीपोटी किंवा घरातले रागवतील म्हणून मुली फारशा तक्रारींच्या फंदात पडत नाहीत; पण तक्रार न केल्यास छेड काढणाऱ्याचे अधिकच फावते. त्यामुळे त्याला वेळीच धडा शिकविणे गरजेचे आहे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासमोर स्वतंत्र मुलींसाठी पोलीस चाैकी उभारण्यात आली आहे. निर्भया पथकाचे काम इथूनच सुरू असते. या चौकीमध्ये सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत आपण तक्रार करू शकता. या चाैकीमुळे छेडछाडीचे प्रकार काॅलेज परिसरात पूर्णपणे कमी झाले आहे.
कोट :
कुठेही मुलींची छेड होत असेल तर निर्भया पथकाशी संपर्क साधावा. आम्ही तत्काळ तेथे पोहोचून संबंधितांना ताब्यात घेतो. समुपदेशातून तोडगा निघाला नाही तर संबंधितांवर गुन्हाही दाखल केला जातो.
अमित साळुंखे, पोलीस कर्मचारी, निर्भया पथक, सातारा