पुसेगाव : ‘आपल्या घरातील माणसं माशासारखी तडफडताना दिसत असल्यावर आपण अशावेळी बघ्याची भूमिका कशी घेऊ शकतो? यावेळी शासन यंत्रणेला हाताशी घेऊन प्रसंगी स्वतःला झळ सोसून आपण नागरिकांना ही सेवा उपलब्ध करून देणारच आहे,’ असे भावनिक आवाहन आमदार महेश शिंदे यांनी केले.
खटाव-कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी त्यांच्या भगिनी डॉ. अरुणा बर्गे यांच्यासह गतवर्षी कोरोना काळात मतदारसंघात कोरोना बाधितांच्यासाठी स्वखर्चाने कोविड सेंटर चालवल्याने अनेकांचे प्राण वाचले. योग्य उपचार मिळाले. याहीवर्षी पुन्हा एकदा कोरोना रुग्णांसाठी मैदानात उतरलेल्या आमदार महेश शिंदे यांची दुसरी इनिंग चालू झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याचे दिसताच आमदार शिंदे यांनी यावेळी प्रशासकीय यंत्रणेला जोडीला घेऊन कोरेगाव येथील जिल्हा उपरुग्णालयाच्या नवीन इमारतीमध्ये नव्याने कोविड सेंटर सुरू केले आहे. बोलण्यापेक्षा करून दाखवणारा आमदार जनतेला मिळाल्याचे समाधान या मतदारसंघात प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसत आहे. ही जिल्ह्यातील नागरिकांसाठी अभिमानाची व दिलासा देणारी हृदयस्पर्शी घटना ठरली आहे.
गतवर्षी उभारलेल्या काडसिध्देश्वर कोविड सेंटरमध्ये १४०० रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले, तर १४ हजार रुग्णांवर आ. शिंदे व डॉ. अरुणा बर्गे यांच्या सहकार्याने अधिक उपचार झाले, तेही स्वखर्चाने. आपल्या माणसांसाठी पन्नास लाखांवर खर्च करणारे आ. शिंदे व अविरत सेवा करणाऱ्या त्यांच्या भगिनी डॉ. अरुणा यांचे उपकार जनता कधीही विसरू शकत नाही.’ (वा.प्र.)