वाई : वाई-जांभळी
रस्त्यावरील तीन हजार लोकसंख्या असलेले मेणवली गाव. मे महिन्यात या गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे चिंतेची बाब झाली होती. परंतु ग्रामपंचायत, सामाजिक संस्था, ग्राम दक्षता समिती व गावातील तरुणाईने पुढाकार घेऊन कोरोनावर नियंत्रण मिळविले आहे.
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत मेणवली गावात २८ फेब्रुवारीला पहिला रुग्ण आढळला. एप्रिलमध्ये १७ रुग्ण सापडले. हे सर्व रुग्ण गृह विलगीकरणामध्येच उपचार घेऊन बरे झाले. त्याच्यामुळे इतरांना संसर्ग झाला नाही. याकरिता ग्राम दक्षता समितीने आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मदतीने रुग्णांना औषध उपचार व गृह विलगीकरणामध्ये काय काळजी घ्यावी याबद्दल प्रत्यक्ष भेटून तसेच फोनद्वारे मार्गदर्शन केले. ग्रामपंचायतीने कोरोना रुग्णाच्या घरचा परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणी व संपूर्ण गावात जंतुनाशक फवारणी केली. यामध्ये काही कुटुंबांनी दक्षता समितीने केलेल्या सूचनांचे पालन केले नाही तसेच आजार लपवून तपासणी करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे व एमआयडीसीमध्ये जाणाऱ्या गावातील कामगारांना त्या ठिकाणी संसर्ग झाला. यामुळे गावातील रुग्णांची संख्या वाढत गेली तसेच मृत्यूचेही प्रमाण वाढले. त्यामुळे गावामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. कोरोना नियंत्रणासाठी गावामध्ये कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली.
आरोग्य केंद्र बावधन यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीने कोरोना तपासणी शिबिर आयोजित केले आणि त्यामध्ये रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांचीही चाचणी करण्यात आली. शिबिरात एकाचवेळी १८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांच्यामुळे होणारा प्रसार रोखण्यासाठी या शिबिराचा मोठ्या उपयोग झाला.
चौकट..
नियमांचे काटेकोर पालन...
या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी ग्रामपंचायत, ग्राम दक्षता समिती व नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नातून अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या. यामध्ये संपूर्ण गाव दोनवेळा निर्जंतुकीकरण करण्यात आले. प्रत्येक घराचा सर्व्हे करून संशयितांची तपासणी करण्यात आली. पॉझिटिव्ह आलेल्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. गावात सोशल डिस्टन्सिंगसह कोरोनाच्या त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करण्यात आले.
कोट..
गावातील नागरिकांनी न घाबरता आजार लपवू नये तसेच कोरोनाची लक्षणे दिसल्यास उशीर न करता लागलीच तपासणी करावी व डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. गावातील आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस व ग्राम दक्षता समिती व नागरिकांनी या लढ्यात मोलाचे सहकार्य केले.
-संजय चौधरी, उपसरपंच, मेणवली